गुन्ह्यांच्या शोधासाठी वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर करा : सतीश माथूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:04 PM2017-09-18T23:04:12+5:302017-09-18T23:04:52+5:30
नाशिक : परदेशात गुन्ह्याची उकल करण्यासाठी वैज्ञानिक तंत्रज्ञान तसेच श्वान पथकाचा पुरेपूर वापर करून घेतला जातो़ मात्र आपल्याकडे उपलब्ध साधनसामग्री आणि तंत्रज्ञान याचा वापर कमी असल्याने त्याचा कामावर परिणाम होतो़ त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी या साधनांचा वापर करण्याचे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी केले़ महाराष्ट्र पोलीस अकादमीतील कर्तव्य मेळाव्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते़
माथूर पुढे बोलताना म्हणाले की, राष्ट्रीय पातळीवर सीसीटीएनएसचा वापर सुरू झाला असला तरी आपल्याकडे अजूनही या प्रणालीच्या वापराबाबत बºयाच अडचणी आहेत़ परदेशात गुन्ह्याची उकल करण्यासाठी श्वान पथकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो़ यामुळे आपल्याकडेही पथकांची संख्या वाढविली जात आहे़ महाराष्ट्र पोलीस दलात आजमितीस सव्वा दोन लाख पोलीस कर्मचारी आहेत़ पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी आॅनलाइन सुविधांचा वापर केल्यास नागरिकही याकडे नक्कीच वळतील़ पोलिसांनी गणेशोत्सव व ईद या सणांमध्ये राखलेली कायदा व सुव्यवस्थेची सरकारने नोंद घेत बक्षीस जाहीर केले असून, महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडल्याचे माथूर यांनी सांगितले़
यावेळी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय कुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक एस. जगन्नाथन (प्रशिक्षण आणि विशेष शाखा), अकादमीचे संचालक विजयसिंग जाधव, अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे, संचालक रितेश कुमार, पोलीस महानिरीक्षक अनुपकुमार सिंग, सुनील रामानंद, विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, श्रीकांत तरवडे, डॉ. जय जाधव आदींसह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते़ प्रास्ताविक स्पर्धेचे संयोजक व गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी केले. पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी आभार मानले.