सात एड्सबाधितांच्या जुळल्या रेशीमगाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 08:36 PM2020-02-09T20:36:58+5:302020-02-09T20:38:08+5:30
नाशिक : कळत नकळत एड्सची लागण झाल्याने समाजापासून काहीसे दूर लोटले गेलेल्या एड्सबाधितांच्या आयुष्याला आता जोडीदाराची साथ लाभणार आहे. ...
नाशिक : कळत नकळत एड्सची लागण झाल्याने समाजापासून काहीसे दूर लोटले गेलेल्या एड्सबाधितांच्या आयुष्याला आता जोडीदाराची साथ लाभणार आहे. अनिश्चिततेच्या सावटाखाली आयुष्य जगण्याच्या वेदना सोसणाऱ्यांना मंगल मैत्री मेळाव्यातून जगण्याची नवी उमेद मिळणार असून, त्यादृष्टीने पहिले पाऊल पुढे टाकण्यात आले.
महिंद्रा आणि महिंद्रा, यश फाउंडेशन तसेच नेटवर्क आॅफ पॉझिटीव्ह पीपल, चिल्ड्रेन लिव्हिंग विथ एचआयव्ही विहान प्रकल्प मालेगाव आणि जिल्हा प्रतिबंध व नियंत्रण पथक नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने गंजमाळ येथील रोटरी सभागृहात एड्सबाधितांचा मंगल मैत्री मेळावा पार पडला. उद्घाटन कर्नल चंद्रा बॅनर्जी, कमलाकर घोंगडे, सुचेता कुलकर्णी, जिल्हा प्रतिबंध व नियंत्रण पथकाचे योगेश परदेशी, एनपीसी संस्थेच्या अध्यक्षा संगीता पवार, यश फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी एड्सबाधीत दाम्पत्यांच्या निगेटिव्ह बाळांचा सत्कार करण्यात आला.
या मेळाव्यात २८० विवाहोत्सुक वधू-वर आणि त्यांच्या पालकांनी सहभाग नोंदविला. या मेळाव्यात वधू-वर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी एकमेकांशी संपर्क साधून चर्चा केली. अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद देत आयुष्यात सोबत जगण्याचा निर्णय घेत विवाहाचा विचार केला, तर लागलीच सात बाधीत जोडप्यांचे विवाह याचठिकाणी जुळून आले.