नाशिकच्या शालिमार चौकात महिलेचा खून?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 03:11 PM2018-01-28T15:11:11+5:302018-01-28T15:12:38+5:30
नाशिक : शहरातील गजबजलेल्या शालिमार चौकातील श्रमिक सेनेच्या कार्यालयाच्या पाठिमागे साधारणत: पंचवीस ते तीस वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी (दि़२८) दुपारच्या सुमारास घडली़ या महिलेवर अत्याचार करून खून करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज पोलीस सूत्रांनी वर्तविला आहे़
श्रमिक सेनेच्या कार्यालयामागे महिलेचा मृतदेह असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी तत्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली़ साधारणत: २५-३० वयोगटातील महिलेचा हा मृतदेह असून तीन चार दिवसांपासून तो या ठिकाणी पडलेला असल्याचा अंदाज आहे़ मृतदेह कुजण्यास सुरुवात झाल्याने पसरलेल्या दुर्गंधीमुळे हे समोर आले़
पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला असून यानंतर महिलेवर अत्याचार तसेच मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे़ दरम्यान, गजबजलेल्या या परिसरात चार दिवसांपूर्वी घटना घडूनही कोणाच्या लक्षात कशी आली नाही याबाबत परिसरात चर्चा सुरू आहे़