डोक्यात टपली मारल्याच्या रागातून नाशिकला युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 10:03 PM2018-02-11T22:03:45+5:302018-02-11T22:06:50+5:30
नाशिक : डोक्यात टपली मारल्याबद्दल जाब विचारल्याने रागातून मित्राने पोटात चाकूने वार केल्याने रुग्णालयात दाखल असलेल्या शिवाजीनगरमधील युवकाचा रविवारी (दि़११) उपचारादरम्यान मृत्यू झाला़ बबन सोमा बेंडकुळे (२५, रा. यशोधन रोहाउस, सिद्धिविनायक मंदिराजवळ, शिवशक्ती चौक, शिवाजीनगर, सातपूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून, दि. २९ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती़ या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी दोघा संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, एकास अटक तर दुसरा फरार आहे़

गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.डी़ पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत बबन बेंडकुळे व संशयित आकाश सुरेश पवार (रा. शिवशक्ती चौक), तुषार दिनेश लांडे (२६) हे एकमेकांचे मित्र आहेत़ दि. २९ जानेवारी रोजी रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास बेंडकुळे हा घराजवळून पायी जात असताना पल्सर दुचाकीवरून (एमएच १५, सीएक्स ०३५५) आलेले पवार व लांडे आले़ यापैकी पवार याने बेंडकुळेच्या डोक्यात टपली मारली असता, त्यास डोक्यात पाठीमागून टपली का मारली याचा बेंडकुळे याने जाब विचारला़ याचा राग आलेल्या लांडे याने बेंडकुळेचे हात धरले तर पवारने कमरेचा चाकू काढून पोटात खुपसला़ यावेळी बेंडकुळे याने आरडाओरड केल्याने नागरिक जमा झाल्यानंतर लांडे व पवार दोघेही फरार झाले़
जखमी बबन बेंडकुळे यास त्याचा मोठा भाऊ छगन बेंडकुळे याने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले़ या प्रकरणी जखमी बबनच्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलीस ठाण्यात पवार व लांडे यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ यापैकी तुषार लांडे यास पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे, तर आकाश पवार फरार आहे़ दरम्यान गंभीर जखमी बेंडकुळे यास रक्तातील कावीळ झाल्याने एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते़ या रुग्णालयात उपचार सुरू असतानाच रविवारी (दि़११) सायंकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़
दरम्यान, संशयितांना अटक करण्याची मागणी मयत बबनच्या नातेवाइकांनी पोलिसांनी केली होती़ पोलीस उपायुक्तलक्ष्मीकांत पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.डी़ पाटील यांनी नातेवाइकांची समजूत काढून संशयितांना अटक करण्याचे आश्वासन दिले़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, संशधित आकाश पवारविरोधात यापूर्वीही एक गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले़