सिन्नर नागरी पतसंस्था फसवणुकीतील प्रमुख संशयित सूरज शहाला गुजरातहून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 10:12 PM2018-03-24T22:12:32+5:302018-03-24T22:12:32+5:30
नाशिक : सिन्नर तालुक्यातील सिन्नर नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या सुमारे ४४ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील प्रमुख संशयित तथा महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण अधिनियम (एमपीआयडी) कायद्यान्वये गुन्हा दाखल असलेला सूरज प्रकाश शहा (४७, रा़शेटे गल्ली, सिन्नर) यास गुजरात व दीवदमन राज्याच्या सीमावर्ती भागातील जैन धर्मशाळेतून स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि़२३) अटक केली़
नाशिक : सिन्नर तालुक्यातील सिन्नर नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या सुमारे ४४ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील प्रमुख संशयित तथा महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण अधिनियम (एमपीआयडी) कायद्यान्वये गुन्हा दाखल असलेला सूरज प्रकाश शहा (४७, रा़शेटे गल्ली, सिन्नर) यास गुजरात व दीवदमन राज्याच्या सीमावर्ती भागातील जैन धर्मशाळेतून स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि़२३) अटक केली़ २९ आॅगस्ट २०१७ पासून संशयित शहा हा पोलिसांना चकवा देत होता़
सिन्नर नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०१४ ते २०१६ लेखापरीक्षण अहवालात संस्थेचे चेअरमन, संचालक, सरव्यवस्थापक व कार्यकारिणीने संगनमत करून संस्थेतील विनातारण कर्ज प्रकरणे, कर्ज बोजा नोंद न केलेल्या मिळकती, कर्ज असताना देण्यात आलेले नील दाखले, संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेर केलेले कर्जवाटप तसेच खोटे दस्तऐवज तयार करून संस्थेची व ठेवीदारांची ४३ कोटी ४८ लाख ४१ हजार ८२२ रुपयांची फसवणूक केली़ याप्रकरणी सनदी लेखापाल अजय राठी यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलीस ठाण्यात २९ आॅगस्ट २०१७ रोजी एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़
सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्याचा तपास ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता़, तर संचालक मंडळातील १३ संशयितांना यापूर्वीच अटक करण्यात आली असली तरी पतसंस्थेचा अध्यक्ष व संशयित सूरज शहा हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता़ स्थानिक गुन्हे शाखेने शहा याचे नातवाईक, मित्रमंडळी यांच्याकडून माहिती मिळवून गिरसोमनाथ जिल्ह्यातून अटक केली़
ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, सहायक पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, पोलीस नाईक प्रीतम लोखंडे, पोलीस शिपाई रवींद्र टर्ले, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, खांडेकर यांनी ही कामगिरी केली़
आठ दिवसांपासून पथक गुजरातमध्ये
संशयित सूरज शहा यांच्या शोधासाठी गेलेले स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आठ दिवसांपासून गुजरात राज्यात शोध घेत होते़ गुजरातमधील विविध शहरे, धार्मिक स्थळे, सुमारे २५० लॉज तसेच धर्मशाळांची या पथकाने तपासणी केली़ विशेष म्हणजे फरार झाल्यानंतर गुजरात, राजस्थान, दीव-दमण राज्यात शहा फिरत होता़ नाशिकपासून सुमारे एक हजार तीनशे किलोमीटरवरील जैन धर्मशाळेत लपून बसलेल्या शहा यास ताब्यात घेतल्यानंतर पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे़
जैन धर्मशाळेतून शहा ताब्यात
एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर चेअरमन तथा प्रमुख संशयित सूरज शहा हा फरार झाला होता़ त्याच्या शोधासाठी सीमेलगतचे जिल्हे तसेच परराज्यांतही पथके पाठविण्यात आली होती, मात्र तो हाती आला नव्हता़ यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे व त्यांच्या पथकाने तपास करून गुजरात राज्यातील गिरसोमनाथ जिल्ह्याच्या उणा तालुक्यातील अंजार येथील एका जैन धर्मशाळेतून त्यास ताब्यात घेतले़
- संजय दराडे, अधीक्षक, नाशिक ग्रामीण