जातीच्या नावाखाली भाषणबाजी चुकीची : पंकजा मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 10:13 PM2018-04-12T22:13:23+5:302018-04-12T22:13:23+5:30
नाशिक : देशात अलीकडे रोजच जातीच्या नावाखाली काही विरोधकांकडून भाषणबाजी केली जात आहे. राजकारण करताना जातीधर्माचा आधार घेतला जात असल्याचा आरोप करीत ही बाब अत्यंत चुकीची असल्याचे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
अस्मिता महिला मेळाव्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपोेषणाचे समर्थन करताना विरोधक संसदेचे कामकाज चालवू देत नसल्यामुळे मोदी यांनी क्लेष व्यक्त करण्यासाठी उपोषण सुरू केले असल्याचे सांगितले. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेने निवडून दिले असल्यामुळे विरोधकांनी जनहितासाठी सभागृह चालविणे अपेक्षित आहे. परंतु विरोधक जातीधर्माच्या आधारावर विधाने करून तेढ वाढवत असून, हे वेदनादायी असल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला. दररोज कुठे ना कठे जातीवादावर प्रतिक्रिया किंवा भाषणे दिली जात असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
राज्यातील महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. याप्रकरणी पोलीस आणि समाजानेदेखील आपली भूमिका पार पाडली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. धनंजय मुंडे यांना पुरस्कार मिळाल्याने मी त्यांचे अभिनंद केले, असा पुरस्कार राष्टÑवादीच्या अन्य कुणालाही मिळाला असता तरी मी त्यांचे अभिनंदन केलेच असते. राजकारण हे केवळ व्यासपीठापुरते मर्यादित असते. अन्यवेळी आम्हीही माणसंच आहोत असे सांगून त्यांनी आपली भावना व्यक्त केली. भगवानबाबांच्या गादीवर बसलेले नामदेव शास्त्री आदरणीयच असल्यामुळे त्यांचा आशीर्वाद यापूर्वीही घेत आले आहे, येथून पुढेही घेणारच, असेही मुंडे म्हणाल्या. प्रशासकीय इमारती असल्या पाहिजे ही सरकारची भूमिका असल्याचे मुंडे यांनी यावेळी सांगितले.