राज्य ग्राहक आयोगाच्या जिल्हा ग्राहक मंच अध्यक्ष, सदस्य परीक्षेचा निकाल जाहीर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 05:45 PM2018-03-16T17:45:19+5:302018-03-16T18:46:29+5:30
नाशिक : राज्य ग्राहक आयोगातर्फे २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या जिल्हा ग्राहक मंच अध्यक्ष व सदस्य पद परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि़१५) सायंकाळी जाहीर करण्यात आला़ अध्यक्षपदाच्या परीक्षेत नाशिक जिल्हा न्यायालयातील अॅड़ मिलिंद महादू निकम (रा़अभिषेक विहार ,म्हसरूळ) हे राज्यात द्वितीय आले असून सदस्य पदासाठीच्या परीक्षेत नाशिकच्या पूनम विजयकुमार महर्षी या सातव्या आल्या आहेत़
राज्य ग्राहक आयोगाने जुलै २०१७ मध्ये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच अध्यक्षांच्या चार तर तर सदस्यपदाच्या २४ जागांसाठी जाहिरात काढली होती़ या परीक्षेसाठी राज्यभरातील हजारो वकीलांनी अर्ज भरून परीक्षा दिली होती़ अध्यक्षपदासाठीच्या चार जागांसाठी झालेल्या परीक्षेत केवळ १४९ परीक्षार्थीं पास झाले त्यापैकी गुणवत्ता यादीनुसार चौघांची निवड करण्यात आली असून अॅड़ मिलिंद निकम यांनी राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे़ निकम हे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) पदाची परीक्षा पास झालेले असून त्यांची निवडही झालेली आहे़ जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्षपद हे जिल्हा न्यायाधीशांच्या समकक्ष आहे़
राज्य ग्राहक आयोगाने जिल्हा तक्रार निवारण मंच सदस्यपदाच्या २८ जागांसाठी जाहीरात काढली होती़ त्यामध्ये राज्यभरातून बसलेल्या हजारो वकीलांपैकी केवळ २४४ पास झाले त्यापैकी गुणवत्ता यादीनुसार २४ जणांची निवड करण्यात आली अॅड़ पूनम महर्षी या राज्यात सातव्या आल्या आहेत़ राज्यातील बहुतांशी ग्राहक तक्रार निवारण मंचमधील रिक्त पदांमुळे कामकाज ठप्प झाले होते़ मात्र, आता परीक्षेचा निकाल लागल्याने या पदांवरील नियुक्त्यानंतर ग्राहक न्यायालयाचे कामकाज सुरळीत होण्यास मदत होणार आहे़