कल्याणकारी योजनांना लोककलावंतांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 08:21 PM2018-08-19T20:21:16+5:302018-08-19T20:22:51+5:30

nashik,state,goverment,welfare,schemes | कल्याणकारी योजनांना लोककलावंतांचा आधार

कल्याणकारी योजनांना लोककलावंतांचा आधार

Next
ठळक मुद्देशासनाचा उपक्रम : शासनाकडून माहिती मिळविण्यास प्रारंभलोकसहभागासह जनजागृतीवर भर


नाशिक : शासनाने राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती गावोगावी पोहचविण्यासाठी शासन आता लोककलावंतांची मदत घेणार आहे. तंत्रज्ञानाच्या युगात प्रगत समाजमाध्यमांचा सरकारकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जात असताना तळागाळापर्यंत पोहचण्यासाठी मात्र लोककलेचा आधार घेतला जाणार आहे.
केंद्र सरकारने डिजिटल इंडियाचा नारा दिल्यानंतर इतर अनेक राज्यांनी प्रगत माहिती युगातील साधनांचा अधिकाधिक वापर सुरू केला आहे. महाराष्टÑदेखील यात मागे नसून महाराष्टÑाने ‘मेक इन महाराष्टÑ’सारखा उपक्रम राबवून तंत्रज्ञानातील सहभाग वाढविला आहे. असे असताना राज्य सरकारला तळागाळापर्यंत पोहचण्यासाठी तंत्रज्ञानाची कास सोडून परंपरागत लोककलेचा आधार घ्यावा लागत आहे. शासनाकडून राबविण्यात आलेल्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहचाव्यात आणि त्यांना या योजनांची माहिती मिळावी यासाठी शासनाने लोककलावंतांना साकडे घातले आहे. राज्यातील लोककलावंतांचा शोध सुरू करण्यात आला असून, यासाठी शासनाच्या संकेतस्थळावर माहिती भरून देण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागातील जनतेला त्यांच्याच भाषेत आणि कलेत योजनांची माहिती मिळाल्यास त्यांच्यात जागृती निर्माण होऊ शकेल, यास्तव शासनाने लोककलावंतांची फौज तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी लोककला व पथनाट्य सादर करणाऱ्या कलावंतांचा शोध घेतला जात आहे. गण-गवळण, अभंग, पोवाडे, वगनाट्य, बहुरूपी, भारूड आदी सादर करणाºया कलावंतांची माहिती घेतली जात आहे. शासनाने गावखेड्यात राबविलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी या कलावंतांना योजनांवर कला सादर करण्यास सांगितले जाणार आहे. यासाठीचा मोबदलादेखील देण्यात येणार आहे. सध्या जिल्हा परिषदेच्या पाणी स्वच्छतेसंदर्भातील अनेक उपक्रमांची माहिती आणि जनजागृती लोककलावंतांच्या माध्यमातून केली जाते. शिवाय आरोग्य संदर्भातील उपाययोजना आणि जनजागृतीसाठीदेखील लोककलावंतांची मदत घेतली जाते. याची आता व्याप्ती वाढविण्यात येणार असून, प्राथमिक सुविधांबरोबरच लोकसहभागासह जनजागृतीवर भर देण्यात येणार आहे.

Web Title: nashik,state,goverment,welfare,schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.