दुष्काळी गावांसाठी एसटीची जलसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 06:35 PM2019-05-26T18:35:32+5:302019-05-26T18:36:33+5:30
नाशिक : केरळ पूरग्रस्तांसाठीची आर्थिक मदत, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना पास सवलत तसेच दुष्काळग्रस्तांसाठी विशेष भरती अशी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ...
नाशिक : केरळ पूरग्रस्तांसाठीची आर्थिक मदत, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना पास सवलत तसेच दुष्काळग्रस्तांसाठी विशेष भरती अशी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाने आता राज्यातील नऊ दुष्काळी जिल्ह्यांमधील काही निवडक गावांना पाणीपुरवठा सुरू केला आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील तीन गावांमध्ये महामंडळाकडून सध्या पाणीपुरवठा केला जात आहे.
गाव तिथे एस.टी. असे ब्रीद मिरवणाºया महामंडळाने दुष्काळी गावात पोहोचून जलसेवा सुरू केली आहे. दुष्काळामुळे अनेक गावांना पाणी मिळणे कठीण झाले असून, पाण्यासाठी भटकंती करणाºया काही गावांना महामंडळाने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी महामंडळाने सामाजिक बांधिलकी म्हणून गेल्या १९ मेपासूनच नऊ जिल्ह्यांतील १९ गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. नाशिक जिल्ह्यातील मनेगाव, पाटुळे आणि रामनगर या गावांना एस.टी. टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करीत आहे. याबरोबरच औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, सातारा, अहमदनगर, बुलढाणा प्रत्येकी तीन टॅँकर याप्रमाणे गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. दुष्काळी गावांची माहिती घेऊन पाणीपुरवठा करणे कुठे शक्य आहे आणि पाण्याची उपलब्धता कशी होऊ शकेल, याचा अभ्यास करूनच गावांची निवड करण्यात आली असून, पाण्याचा अपव्यय न होता वेळेत पाणीपुरवठा करण्यावर भर देण्यात आला आहे.
ज्या ठिकाणी औद्योगिक वसाहत किंवा नगरपालिका हद्दीत पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणाहून पाणी उचलण्यात येत आहे. शिवाय जेथे दोन्ही व्यवस्था उपलब्ध नाहीत अशावेळी शहरालगत खासगी टॅँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.