विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तींना अजूनही विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 06:32 PM2019-03-14T18:32:04+5:302019-03-14T18:32:42+5:30
नाशिक : विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिष्यवृत्ती विलंब होण्याचा प्रकार अद्यापही सुरूच असून, यावर्षी शिष्यवृत्तीचे प्रस्ताव अजूनही पूर्णत्वास येऊ ...
नाशिक : विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिष्यवृत्ती विलंब होण्याचा प्रकार अद्यापही सुरूच असून, यावर्षी शिष्यवृत्तीचे प्रस्ताव अजूनही पूर्णत्वास येऊ शकलेले नाही. त्यामुळे अशा प्रकारचे प्रस्ताव सादर करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली असून, याप्रकरणाची जबाबदारी समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांकडे सोपविण्यात आली आहे.
विशिष्ट जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व फ्रीशीप योजनेंतर्गत अर्ज महाविद्यालयाच्या माध्यमातून समाजकल्याण विभागाकडे मंजुरीसाठी पाठविले जातात. परंतु अशा प्रकारचे शिष्यवृत्तीचे प्रस्ताव अनेकदा महाविद्यालयीन आणि समाजकल्याण विभागातच पडून राहतात. त्यावर अपेक्षित निर्णय आणि निर्धारित वळेत प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाही होत नसल्याने विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहत आहेत. मागील दोन वर्षांपासून याच कारणास्तव शिष्यवृक्ती मिळू शकलेली नाही.
शिष्यवृत्तीचे प्रस्ताव फेब्रुवारी महिन्यातच निकाली काढण्यासंदर्भात समाजकल्याण विभागाला शासनाने कळविले होते. मात्र तरीही प्रकरणे दाखल होण्यास विलंब होत असल्याने प्रस्ताव सादर करण्याची मुदत वाढवून देण्याची विनंती शासनाला करण्यात आली होती. त्यानुसार आता ३१ मार्च अखेर शिष्यवृत्तीचे प्रलंबित प्रस्ताव सादर करण्याचा ‘अल्टिमेटम’ देण्यात आला आहे.
आता देण्यात आलेली मुदत अंतिम असून प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा विलंब झाल्यास समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त तसेच संबंधित महाविद्यालयांना जबाबदार धरले जाणार आहे.