माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे बॅँक खाते नसल्याने रखडली शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 07:31 PM2018-02-21T19:31:55+5:302018-02-21T19:38:58+5:30
नाशिक : माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे बॅँक खाते आॅनलाइन भरण्याची जबाबदारी पंचायत समितीची असतानाही जिल्ह्यातील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांचे बॅँक खाते अद्यापही आॅनलाइन जोडले गेले नसल्याने विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.
नाशिक : माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे बॅँक खाते आॅनलाइन भरण्याची जबाबदारी पंचायत समितीची असतानाही जिल्ह्यातील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांचे बॅँक खाते अद्यापही आॅनलाइन जोडले गेले नसल्याने विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात पंचायत समित्यांना जानेवारीचा अल्टिमेटम देण्यात येऊनही या कामाला अपेक्षित गती प्राप्त झाली नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शालेय शिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या माध्यमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीचा निकाल आॅनलाइन काढून तो विद्यार्थ्यांना कळविण्याची जबाबदार गटशिक्षणाधिकारी आणि शहरात शिक्षण मंडळाची आहे. विद्यार्थ्यांना प्राप्त शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी संबंधितांनी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्याची माहिती आॅनलाइन भरण्याचे काम तालुका पातळीवर पंचायत समिती आणि शहरात शिक्षण मंडळांनी करणे अपेक्षित आहे. मात्र माध्यमिक शिक्षण विभागाने वारंवार सूचना करूनही अद्याप सुमारे एक हजार विद्यार्थ्यांचे बॅँक खाते शिष्यवृत्तीच्या संकेतस्थळावर भरण्यात आलेले नाही.
संबंधितानी शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांची माहिती भरून तत्काळ कार्यवाही करावी, अशी सूचना पंचायत समिती आणि शिक्षण मंडळाला करण्यात आलेली आहे. मात्र अजूनही संबंधित विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्याची माहिती भरण्यात आलेली नाही. यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलवरून माहिती भरण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने त्यावेळी माहिती भरणे शक्य झाले नाही, मात्र या यंत्रणेतील त्रुटींमुळे ‘एज्युकेशन स्कॉलरशिप डॉट कॉम’ या संकेतस्थळावर माहिती भरण्याचे आवाहन पंचायत समिती आणि शिक्षण मंडळाला करण्यात आलेले आहे. मात्र या कामात अक्षम्य दिरंगाई सुरू असून या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे एकूणच चित्र आहे.