नापास होण्याच्या भीतीने अभियांत्रिकी विद्यार्थ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 09:36 PM2018-03-30T21:36:17+5:302018-03-30T21:36:17+5:30
नाशिक : अभियांत्रिकी शाखेच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने आलेल्या नैराश्यातून विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना सिडकोतील त्रिमूर्ती चौकात गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. विशाल संतोष नागोरी (१९) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो शहरातीलच एका अभियांत्रिकी महाविद्यालयात मॅकेनिकल डिप्लोमाच्या वर्गात शिकत होता.

सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथील भाग्यलक्ष्मी अपार्टमेंट येथे राहणारा विशाल नागोरी हा शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात मॅकेनिकल डिप्लोमाच्या द्वितीय वर्षात शिकत होता. परीक्षेत सातत्याने येणाऱ्या अपयशामुळे विशाल काहीसा नैराश्यामध्ये असल्याची बाब चौकशीत समोर आली. या नैराश्यातूनच गुरुवार, दि. २९ रोजी दुपारच्या सुमारास त्याने घरातील पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर बाब कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले. पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
परीक्षेत काही विषयात सातत्याने येत असलेल्या अपयशामुळे विशालवर परीक्षेचे काहीसे दडपण आले होते. त्याला एक वर्षाचा ड्रॉपआॅफ (वायडी) बसला होता. त्यामुळे तो बाहेरून परीक्षा देणार होता. द्वितीय वर्षाची परीक्षा ही १२ एप्रिलपासून सुरू होणार होती. या परीक्षेची तो तयारी करीत होता. या परीक्षेवरच त्याच्या पुढील वर्गातील प्रवेश निश्चित होणार असल्याने विशाल दडपणात होता. त्याला परीक्षेसंदर्भात नैराश्य आल्यानेच त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.