नाशिकच्या तनिषा कोटेचाला सबज्युनियरचे विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 06:56 PM2018-08-13T18:56:46+5:302018-08-13T18:59:07+5:30
नाशिक : नाशिक जिमखाना येथे सुरू असलेल्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या तनिषा कोटचेने हिने सबज्युनिअरचे विजेतेपट पटकाविले.
नाशिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीने नाशिक जिमखाना येथे आयोजित तिसऱ्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस मानांकन स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी ज्युनियर, सबज्युनियर, कॅडेट आणि मिडजेट या चारही गटांचे अंतिम सामने खेळविले गेले. यामध्ये सब ज्युनीयर मुलींच्या गटात यजमान नाशिकची तनिषा कोटेचा आणि तिया वाघ यांच्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात तनिषाने जोमाने खेळ करून हा सामना ४-२ असा जिंकून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मिडजेट मुलांच्या गटात चौथा मानांकित परभणीचा वरद लोहाट आणि पुण्याच्या चौथा मानांकित अभिराज सकपाळ यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात वरद लोहाटने या सामन्यावर संपूर्ण पकड राखत हा सामना सरळ ४-२ असा जिंकून विजेतेपद पटकावले.
मिडजेट मुलीमध्ये दुसरे मानांकित नभा किरकोले (पुणे ) आणि प्रथम मानांकित अकोल्याच्या रिया कोठारी यांच्यात अंतिम सामना पार पडला. सामन्यात २-२ अशी बरोबरी झाली. त्यामुळे सर्वांचे लक्ष लागलेल्या निर्णायक गेममध्ये नभा किरकोलेने सय्यमाने खेळ करून हा गेम ११-०६ असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव पक्के केले.
कॅडेट मुलांच्या गटात चवथा मानांकित अक्षत जैन (मुंबई उपनगर ) आणि नील मुळे (पुणे) यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरच्या अक्षत जैनने ४-२ अशी लढत जिंकून विजेतेपद मिळविले.
कॅडेट मुलीमध्ये केईशा झवेरी (मुंबई शहर) आणि सना डिसूझा (मुंबई उपनगर ) यांच्यात झालेला सामना चांगलाच रंगला. यामध्ये दोन्ही खेळाडूंनी ३-३ असा जिंकून चुरस निर्माण केली. परंतु शेवटच्या निर्णायक सेटमध्ये सना डिसूझाने सुरुवातीपासूनच आघाडी घेत हा गेम ११-०५ असा जिंकून या गटाचे विजेतेपद मिळविले.
सबज्युनियर मुलांच्या गटात मुंबई उपनगरच्या हार्वेश असराणीने हा अंतिम सामना ३-१ असा जिंकून विजेतेपद पटकावले.
ज्युनियर मुलीमध्ये अंतिम लढतीत मनुश्री पाटीलने तेजल कांबळेचा ३-१ असा पराभव करून या गटाचे विजेतेपद मिळविले, तर ज्युनियर मुलांमध्ये रंगतदार झालेल्या सामन्यात मुंबईच्या रेगन अल्बुकर्कने दोन गेमची आघाडी मिळविली, तर तिसरा गेम अश्विन सुब्रमणियमने जिंकून या सामन्यात रंगात आणली. परंतु रेगन अल्बुकर्कने नंतरच्या दोन गेममधे सहज सुंदर खेळ करून हा सामना ४-१ असा जिंकून मुलांच्या ज्युनियर गटाचे विजेतेपद पटकावले.