नाशिकमध्ये दहा लाखांच्या दागिण्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 04:13 PM2018-02-07T16:13:47+5:302018-02-07T16:16:47+5:30
नाशिक : बंद घरातील हॉलच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे दहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सिडकोतील अश्विननगरमध्ये घडली़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नाशिक : बंद घरातील हॉलच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे दहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सिडकोतील अश्विननगरमध्ये घडली़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अश्विननगर परिसरातील स्वामी विवेकानंद तलावाच्या पाठिमागे तेजस निर्मल झवेरी हे राहतात़ २ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत झवेरी कुटुंबिय नातेवाईकांच्या विवाहासाठी मुंबईला गेले होते़ या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या हॉलच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला़ यानंतर घरातील दोन्ही बेडरुममधील लोखंडी व लाकडी कपाटात ठेवलेल्या तीन लाखांच्या रोख रकमेसह दहा लाख १० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले़
चोरट्यांनी चोरून नेलेल्या ऐवजामध्ये तीन लाखांची रोकड, चार तोळे वजनाचा ८० हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार व कानातील कर्णफुले, १५ तोळे वजनाच्या तीन लाख रुपयांच्या १२ बांगड्या, एक तोळे वजनाचा २० हजार रुपयांचा सोन्याचा हार, ४० हजार रुपये किमतीची दोन तोळे वजनाच्या स्क्रू लॉकिंग सोन्याच्या बांगड्या, १ लाख ६० हजार रुपये किमतीच्या ८ तोळे वजनाच्या गळ्यातील ४ चेन, ४० हजार रुपये किमतीच्या दोन तोळे वजनाच्या तीन अंगठ्या, तीन तोळे वजनाचा ६० हजार रुपये किमतीचा एक सोन्याचा शिक्का, १० हजार रुपये किमतीचे चांदीचे चार कॉईनचा समावेश आहे़
विवाह समारंभावरून परतलयानंतर झवेरी कुटुंबीय परतल्यानंतर घरी घरफोडी झाल्याचे समोर आले़ त्यांनी तत्काळ अंबड पोलिसांना माहिती दिल्यानंतर परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, विभाग तीनचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन गोरे, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक मुंढे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.