झाडे उन्मळून पडल्याने यंत्रणेवर ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 06:59 PM2019-07-08T18:59:08+5:302019-07-08T19:00:06+5:30
नाशिक : गेल्या शनिवारपासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी चांगलाच जोर धरला आणि दिवसभर जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडे ...
नाशिक : गेल्या शनिवारपासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी चांगलाच जोर धरला आणि दिवसभर जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर जुने नाशिक भागातील काही ठिकाणी वाड्यांच्या भिंती कोसळल्याने आपात्कालीन परिस्थिती उद्भवली होती. अशा परिस्थितीत पडलेली झाडे तोडण्यासाठी ठेकेदाराकडे असलेले मनुष्यबळ इतर आपात्कालीन कामांमध्ये अडकून पडल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवर तासंतास झाडे तशीच पडून होती.
पावसाळ्यात रस्त्यावर पडलेली तसेच धोकादायक स्थितीतील झाडे तोडण्यासाठी महापालिकेच्या वतीने ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आलेली आहे. रविवारी शहर परिसरात अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे साहजिकच ठेकेदाराच्या यंत्रणेकडूनच रस्त्यावर आडवी पडलेली झाडे तोडण्यासाठी लाकूडतोड्यांची मदत घ्यावी लागते. मात्र शहरात अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे ठेकेदाराकडील लाकूड तोडणारी माणसे कामात अडकली असल्यामुळे शहराती काही भागांत पोहचण्यात काहीसा विलंब झाल्याने तासंतास झाडे पडून होती. त्यामुळे अशा मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. उपनगर येथील म्हसोबा मंदिरासमोर पडलेल्या झाडामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला होता. परंतु जोपर्यंत कर्मचारी झाड तोडण्यासाठी येत नाहीत तोपर्यंत वाट पाहाण्याशिवाय पर्याय नव्हता. ठेकेदाराकडील लाकूड तोडणारी माणसे जुने नाशिकमधील आपत्कालीन कामात अडकल्याने झाड बाजूला करण्यास विलंब झाल्याचे नगरसेविका सुषमा पगारे यांनी सांगितले. दोन तासांनंतर रस्ता मोकळा करण्यात आला.