पुलांच्या कथड्यांना पाणवेली, प्लॅस्टिक अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 04:37 PM2019-08-05T16:37:17+5:302019-08-05T16:38:50+5:30
नाशिक : पुराची पातळी कमी झाल्यानंतर पुलांच्या कथड्यांना मोठ्या प्रमाणात पाणवेली आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांसह कापडाचे तुकडे अडकल्याचे समोर आले ...
नाशिक : पुराची पातळी कमी झाल्यानंतर पुलांच्या कथड्यांना मोठ्या प्रमाणात पाणवेली आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांसह कापडाचे तुकडे अडकल्याचे समोर आले आहे. रविवारी गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील अनेक पुलांवरून पाणी वाहत होते. सोमवारी पुराची पातळी कमी झाल्यानंतर पुलांवर सर्वत्र चिखल साचलेला आढळून आला, तर कथड्यांना मोठ्या प्रमाणात कचरा अडकल्याने महापालिकेकडून कथडे साफ करण्याचे काम सुरू होते.
जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या दोन दिवसांपासून धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नदीला महापूर आल्याने या पुरात नदीवरील अनेक छोटे पूल पाण्याखाली गेले होते. शहरातील आनंदवली, आसारामजीबापू पूल, रामवाडी, तपोवन, टाकळी, तपोवनरोड आदी अनेक पुलांवरून पाणी वाहत होते. पुराची पातळी वाढत गेल्याने या सर्व पुलांवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. गेल्या चोवीस तासांपेक्षा अधिक काळ पुलांवरून पाणी वाहत असल्याने पाण्यात वाहून आलेला कचरा कथड्याला अडकून पडला आहे. या सर्वच पुलांवर मोठ्या प्रमाणात कचरा आणि चिखल निर्माण झाला आहे. सोमवारी पावसाची तीव्रता काहीशी कमी झाल्यानंतर पुलांवरील कचरा काढण्याचे काम सुरू करण्यात आले.