नाशिकच्या औष्णिक केंद्रातील वीज निर्मिती घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 05:27 PM2017-09-19T17:27:23+5:302017-09-19T17:27:29+5:30
नाशिक : राज्यातील कोळशाची टंचाई अजूनही कायम असल्याने औष्णिक वीज: निर्मिती केंद्रातील विजेचे उत्पादन घटले आहे. नाशिकमधील औष्णिक केंद्रातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नसून कोळशाच्या तुटवड्यामुळे केवळ १६० मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. कोळशाचा पुरवठा पूर्ववत कधी होईल याबाबत मुख्य कार्यालयाकडून कोणतीही सूचना नसल्याने केंद्र चालविण्यावरील टांगती तलवार कायम आहे.
कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यातील सात औष्णिक वीज निर्मिती केंद्रांतील वीज निर्मिती कमी झाली असून, कोळशाअभावी एकलहरे येथील वीज निर्मितीही संकटात सापडली आहे. भुसावळ, खापरखेडा आणि परळी पाठोपाठ एकलहºयातही केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक ठेवला जात आहे. त्यामुळे दर दोन दिवसांनी उपलब्ध होणाºया कोळशाच्या प्रमाणावर वीज निर्मितीचे प्रमाण अवलंबून आहे. वास्तविक औष्णिक केंद्रांकडे सात दिवस पुरेल इतका कोळसा शिल्लक ठेवणे अपेक्षित असताना या केंद्रांकडे केवळ तीन दिवसांचाच कोळसा शिल्लक राहत असून, दोन दिवसांत हा कोळसाही संपत असल्याने तिसºया दिवसाची चिंता मुख्य अभियंत्यांना असते.
नाशिकमधील एकलहरे येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात केवळ तीन दिवस पुरेल इतकाच स्टॉक मेन्टेन केला जात आहे. उपलब्ध कोळशाची मर्यादा लक्षात घेता २१० मेगावॅटच्या दोन संचांमधून एकूण १६० मेगावॅट इतकीच वीज निर्माण केली जात आहे. तिसरा २१० मेगावॅटचा संच सध्या वार्षिक देखभाल दुरुस्तीमुळे बंद ठेवण्यात आलेला आहे.
२१० मेगावॅटचे दोन संच सुरू असले तरी कोळशाअभावी या संचामधूनही कमी प्रमाणात वीज निर्मिती होत आहे. संच चालविण्यासाठी प्रतिदिन कोळशाची मागणी नोंदविली जाते, परंतु मुख्य कार्यालयाकडून कोणतीही हमी दिली जात नसल्याने असलेल्या कोळशाचा मर्यादित वापर करून वीज निर्मिती करावी लागत आहे. राज्यातील कोळशाची ही बिकट परिस्थिती पाहता काही औष्णिक केंद्र बंद होण्याची शक्यता आहे. नाशिकचे सध्या दोनच संच सुरू असून, या केंद्राला जर वेळेवर कोळसा पुरवठा झाला नाही तर दोन्ही संच बंद ठेवण्याची नामुष्की नाशिकवर येण्याची शक्यता आहे. नाशिकचे सध्या दोनच संच सुरू असून, दोन्ही संच प्रत्येकी २१० मेगावॅट निर्मिती करतात. पुरेसा कोळसा मिळाला तर आणखी काही मेगावॅट वीज निर्माण होऊ शकेल प्रसंगी २१० चे दोन्ही संच पूर्ण क्षमतेचे चालविलेही जाऊ शकतात. मात्र कोळशामुळे दोन्ही संच मिळून केवळ १६० मेगावॅट इतकीच वीज निर्माण करीत आहेत.