तृतीयपंथियांनाही कायद्याचे समान संरक्षण : बुक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 11:16 PM2017-10-06T23:16:28+5:302017-10-06T23:18:03+5:30
नाशिक : देशातील सर्व नागरिक हे कायद्याने समान असून तृतीयपंथिय हेदेखील समाजाचा एक भाग आहे़ त्यांनाही कायद्याचे संरक्षण असून त्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांनी दाद मागावी असे आवाहन जिल्हा न्यायालयातील विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस़एम़बुक्के यांनी केले़ कोजागरी पौर्णिमेचे औचित्य साधून सप्तशृंग गडावर देवीच्या पूजेसाठी देशभरातून आलेल्या तृतीयपंथीयासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते़
सप्तशृंगी गडावर कोजगरी पौर्णिमेला देवीच्या पूजेसाठी देशभरातील तृतीयपंथीय या दिवशी एकत्र येतात़ तृतीयपंथीयांना समाजात वावरताना येणाºया अडचणी तसेच कायद्याने दिलेले सर्वांना समान अधिकार याबाबत माहिती मिळाली यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी बुक्के यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, तृतीयपंथीयांना नेहेमी समाजाकडून त्रास सहन करावा लागतो़ त्यांच्यासोबत दडपशाही व भेदभाव हा ठरलेलाच असतो़ तृतीयपंथियांचे कुटुंबदेखील त्यांचे हक्क डावलतात़ स्त्री-पुरुष असो की तृतीयपंथी हे सर्व समाजाचे घटक असून सर्वांना कायद्याने समान अधिकार दिले आहेत़ या तृतीय पंथियांमध्ये समानतेची भावना निर्माण होणे गरजेचे असल्याचे बुक्के यांनी यावेळी सांगितले़
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमास सुमारे दीडशेहून अधिक तृतीयपंथी उपस्थित होते़ यावेळी रुग्णालयांमध्ये तृतीयपंथियांसाठी स्वतंत्र रुम आणि स्वतंत्र सार्वजनिक शौचालय असावे अशी अपेक्षा काही तृतीयपंथियांनी व्यक्त केली़.