पाणीपट्टी वसुलीसाठी आता अल्टिमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 10:50 PM2018-08-23T22:50:05+5:302018-08-23T22:53:42+5:30
नाशिक : थकीत पाणीपट्टीमुळे संबंधित ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा रद्द करण्याचे जाहीर करूनही पाणीपट्टी भरण्याला अपेक्षित गती नसल्याने आता मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी पुन्हा एकदा ग्रामपंचायतींना अल्टिमेटम दिला आहे.
थकीत पाणीपट्टीमुळे नांदगाव शहर व ५६ खेडी पाणीपुरवठा योजना तसेच दाभाडी १२ गाव पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. याबाबत झालेल्या आढावा बैठकीत सर्व ग्रामपंचायतींनी टप्प्याटप्प्याने थकीत पाणीपट्टी भरण्याचे मान्य केल्याने २४ आॅगस्टपासून सदरचा पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले. या तिन्ही योजनांतून आतापर्यंत दीड कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
नांदगाव शहर व ५६ खेडी पाणीपुरवठा योजना तसेच दाभाडी १२ गाव पाणीपुरवठा योजनांचा पाणीपुरवठा थकीत पाणीपट्टीमुळे गेल्या १६ आॅगस्टपासून खंडित करण्यात आला आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेऊन पाणीपट्टी भरण्याच्या सूचना दिल्या.
गावातील पाणीपट्टी वसूल करून जिल्हा परिषदेला भरण्याचे ग्रामसेवकांना बंधनकारक असूनदेखील त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच पाणीपेट्टी थकीत राहण्याचे प्रमाण वाढले असल्याने यापुढे याबाबत ग्रामसेवकांना जबाबदार धरणार असल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले. नांदगाव व मालेगाव तालुके दुष्काळग्रस्त असल्याने टप्प्याटप्प्याने पाणीपट्टी भरण्यासाठी मुदत देण्याचे सरपंच यांनी यावेळी सांगितले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २५ टक्के थकबाकी भरून उर्वरित रक्कम विहित मुदतीत भरण्याचे आदेश डॉ. गिते यांनी दिले. तसेच १६ आॅगस्टपासून खंडित करण्यात आलेला पाणीपुरवठा शुक्र वार (दि. २४) पासून पूर्ववत सुरू करण्याचे आदेश संबंधित विभागास दिले. यावेळी उपकार्यकारी अभियंता ए. एन. पाटील, उपअभियंता प्रकाश बोरसे उपस्थित होते.