कुपोषित बालकांसाठी ४१० ग्राम बालविकास केंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:57 PM2018-03-19T23:57:13+5:302018-03-19T23:57:13+5:30
नाशिक : जिल्ह्यात सुमारे अडीच हजार बालके कुपोषित आढळल्याची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीने लोकसहभागातून ४१० ग्राम बालविकास केंद्रे सुरू केली असून, या केंद्रात सद्यस्थितीत सुमारे ४९६ बालकांना पूरक आहार आणि औषधोपचार सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यात गंभीर कुपोषित बालकांची संख्या ६२९ तर मध्यम गंभीर कुपोषित बालकांची संख्या २०४२ इतकी आढळून आल्यानंतर महिला व बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर यांनी अधिकाऱ्यांना केंद्रे सुरू करण्याचे आदेश दिले होते.
गेल्या आठवड्यात झालेल्या विषय समितीच्या सभेत जिल्ह्यातील कुपोषित बालकांचा आढावा घेण्यात आला असता धक्कादायक आकडेवारी समोर आली होती. जिल्ह्यात फेब्रुवारी २०१८ अखेर मध्यम गंभीर कुपोषित बालके २०४२ व तीव्र गंभीर कुपोषित बालकांची संख्या ६२९ आढळून आली आहे. कुपोषण हा विषय अतिशय संवेदशनील असतानाही त्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याने कुपोषित बालक आणि मातांचे प्रमाण वाढल्याने सभापती खोसकर यांनी अधिकाºयांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार अवघ्या दोनच दिवसांत लोकांनी मदतीचा हात पुढे केल्याने ४१० प्रकल्पांमध्ये ग्राम बालविकास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
या केंद्राच्या माध्यमातून कुपोषित बालकांच्या आहाराचे आणि उपचाराचे नियोजन करण्यात आले आहे. या केंद्रात २५ दिवस बालकांना ठेवण्यात येणार आहे. केंद्रात दाखल झालेल्या बालकांचे वजन करणे आणि पंचवीस दिवसांनंतर पुन्हा वजन करणे, अशी ही प्रक्रिया आहे. तसेच दिवसातून आठ वेळा कुपोषित बालकांना आहार देण्यात येणार असून त्यामध्ये सहा वेळा केंद्रातून आहार दिला जाणार आहे, तर दोन वेळचा घरचा आहार बालकांना दिला जाणार आहे. सदर केंद्र सुरू करण्यासाठी दानशूरांनी मोठी मदत केली आहे. सुमारे ५७ हजार रुपये वस्तू स्वरूपात प्राप्त झाले आहे, तर दोन लाख ७९ हजार रुपये रोख स्वरूपात जमा झाले आहेत. या पैशातून आणि दानातून बालकांना सुदृढ बनविण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.