वासाळी शिवारातील नदीपात्रात २१२ जिवंत काडतुसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 03:57 PM2018-03-22T15:57:12+5:302018-03-22T16:03:28+5:30
नाशिक : सातपूर वासाळी गावाजवळील नासर्डी नदीवरील पुलाखालील नदीपात्रात बेवारस व गंजलेल्या स्थितीतील रायफल व बंदुकीचे २१२ जिवंत काडतुसे तर ५६ पुंगळ्या आढळून आल्याचा प्रकार बुधवारी (दि़२१) रात्री नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आला़ पोलिसांनी ही काडतुसे जप्त केली असून याची सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
नाशिक : सातपूर वासाळी गावाजवळील नासर्डी नदीवरील पुलाखालील नदीपात्रात बेवारस व गंजलेल्या स्थितीतील रायफल व बंदुकीचे २१२ जिवंत काडतुसे तर ५६ पुंगळ्या आढळून आल्याचा प्रकार बुधवारी (दि़२१) रात्री नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आला़ पोलिसांनी ही काडतुसे जप्त केली असून याची सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वासाळी गावाजवळील नासर्डी नदीपात्रात रायफल वा बंदुकीची गंजलेली काडतुसे पडली असल्याची माहिती वासाळी गावचे सरंपचांनी सातपूर पोलीस ठाण्याचे बीटमार्शल पोलीस नाईक झोले यांना फोनवरून दिली़ त्यानंतर झोले यांनी ही माहिती सहायक पोलीस निरीक्षक वाय़ए़देवरे यांना सांगितल्यानंतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असता त्यांना ११३ जिवंत राऊंड व ४१ पुंगळ्या आढळून आल्या़ या घटनेची माहिती वरीष्ठ पोलीस अधिकारी , दहशतवादविरोधी पथक, बीडीडीएस यांना कळविण्यात आली़ संबंधित पथके घटनास्थळी आल्यानंतर या ठिकाणी शोधमोहिम राबविली असता नदीपात्रामध्येच पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये ९९ संपूर्ण गंजलेले काडतुसे व १५ पुंगळ्या आढळून आल्या़
पोलिसांनी सापडलेल्या या काडतुसांमध्ये ०़३०३ चे ८३, एके-४७ चे ३५, ९ एमएमचे ४७, ४१० मस्केटचे ४७ जिवंत काडतुसे तर ९ एमएमच्या १८ पुंगळ्या, ०़२२ एमएमच्या २३ पुंगळ्या, ०़३०३ च्या १५ पुंगळ्या असे एकूण २१२ जिवंत राऊंड व ५६ पुंगळ्यांचा समावेश आहे़ या काडतुस शोध मोहिमेत पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन गोरे, सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश आखाडे, विशेष शाखा, दहशतवादविरोधी पथक व बॉम्बशोधक-नाशक पथकातील अधिकारी सहभागी झाले होते़ दरम्यान, काडतुसे नदीपात्रात कोणी फेकली याबाबत शोध सुरू करण्यात आला असून यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेची मदत घेतली जाणार आहे़
महाराष्ट्रात बिनतारी संदेशाद्वारे माहिती
नासर्डी नदीपात्रात सापडलेली काडतुसे ही गंजलेल्या अवस्थेत असून त्याबाबत खात्री करण्याचे काम सुरू आहे़ या काडतुसांबाबत संपूर्ण महाराष्ट्रात बिनतारी संदेशाद्वारे संदेश देण्यात आला असून पोलीस अथवा केंद्रीय संरक्षण दल, भारतीय स्थळसेना, निमलष्करी दल वा संरक्षण विभागातील काडतुसे गहाळ वा चोरी गेल्याबाबत गुन्ह्या दाखल असल्यास त्यांची माहिती देण्याची विनंती करण्यात आली आहे़
- रविंद्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक़