दहा दिवसांत मिळणार वाहन परवाना, नोंदणी प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 10:23 PM2017-10-09T22:23:00+5:302017-10-09T22:25:51+5:30
नाशिक : प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) व पोस्ट खाते यांच्यातील असमन्वयामुळे वाहनचालकांना वाहन परवाना व नवीन वाहन नोंदणी प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या़ या असमन्वयाची प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दखल घेऊन वाहनचालकांना दहा दिवसांत वाहन परवाना व वाहन नोंदणी प्रमाणपत्र मिळेल, अशी नवीन यंत्रणा सुरू केली आहे़
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील विविध अडचणींचा सामना केल्यानंतर वाहनचालक परीक्षेचे अग्निदिव्य पार करतात़ मात्र, यानंतर वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी आरटीओ आणि टपाल खात्याच्या चकरा माराव्या लागतात़ त्यातच टपाल खात्याकडून पत्ता चुकीचा आहे, घरी कोणी नव्हते, घरच सापडले नाही अशी विविध कारणे देत काही दिवसांनंतर संबंधित वाहन परवाना वा वाहन नोंदणी प्रमाणपत्र पुन्हा आरटीओकडे जमा केले जाते़ तर अनेकदा यासाठी आर्थिक भुर्दंडही सोसावा लागतो़
प्रादेशिक परिवहन अधिकारी कळसकर व पोस्ट विभाग यांनी परवाना वाटप कार्यपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल केला आहे़ आरटीओत अर्ज सादर केल्यानंतर त्यावरील आवश्यक कामकाज पूर्ण करून तीन दिवसांत अर्जदाराचा चालक वाहन परवाना वा नोंदणी प्रमाणपत्र तयार करून पोस्ट विभागास अर्जदाराच्या पत्त्यावर बटवडा करण्यासाठी हस्तांतरित करतील़ त्यानंतर पोस्ट विभागाकडून पुढील आवश्यक कारवाई करून ते अर्जदाराच्या वास्तव्याच्या पत्त्यावर सात दिवसांचे आत बटवडा करणार आहेत़ ज्या अर्जदाराचे चालक परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र काही कारणास्तव बटवडा न झाल्यास ते अर्जदाराच्या वास्तव्याच्या पत्त्याच्या परीक्षेत्रामधील पोस्ट कार्यालयात सात दिवसांसाठी ठेवण्यात येईल़ त्यानंतर ते प्रादेशिक परिवहन कार्यालयात परत पाठविण्यात येणार आहे़
प्रादेशिक परिवहन कार्यालयात ज्या अर्जदारांनी नवीन वाहनचालक परवाना किंवा नवीन वाहन नोंदणीसाठी अर्ज केल्यानंतर त्यांच्या मोबाइल क्रमांकावर त्यांचा अर्ज मंजूर झाल्याचा संदेश मिळणार आहे. हा संदेश मिळाल्यापासून दहा दिवसांत त्यांचा वाहन परवाना किंवा नवीन वाहन नोंदणी प्रमाणपत्र न मिळाल्यास अर्जदारांनी त्यांच्या निवासस्थानाजवळील पोस्ट खात्यात संपर्क करावा. या ठिकाणी नोंदणी प्रमाणपत्र किंवा परवाना न मिळाल्यास प्रादेशिक परिवहन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन कळसकर यांनी केले आहे.