विश्वास नांगरे पाटील दिवसभर नाशिकरोड पोलीसठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 09:02 PM2019-11-13T21:02:44+5:302019-11-13T21:04:32+5:30
नाशिकरोड : प्रतिनिधी शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील पोलीस चौक्या अधिक सक्षम करणार असल्याची माहिती पोलीस ...
नाशिकरोड : प्रतिनिधी
शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील पोलीस चौक्या अधिक सक्षम करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी पोलीस आयुक्त बुधवारी दिवसभर नाशिकरोड पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते.
आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बुधवारी दिवसभर नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या संपूर्ण कामकाजाची माहिती घेतली. सर्व पोलीस कर्मचा-यांशी त्यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विशेषता: महिला कर्मचा-यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिले. यावेळी त्यांनी सर्व विभागांच्या कामकाजाची माहिती घेतली. महिला सुरक्षा समितीचीही बैठक घेत महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. सायंकाळी दाखल गुन्हे आणि त्यांचा तपास याविषयी सर्व गुन्हे तपासी अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिका-यांची बैठक घेत त्यांना आवश्यक त्या सुचना केल्या. याप्रसंगी पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त ईश्वर वसावे, पोलीस निरीक्षक सुरज बिजली आदींसह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आयुक्तांनी स्मार्ट सिटी विभागाच्या पथकासह नागरिकांचीही भेट घेतली. शहरातील वाहतूक कोंडी, अनिधकृत पार्कींग, महिला सुरक्षा, पोलीस कॉलनीतील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या समस्या, महिला सुरक्षा समितीच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. शहरातील क्यूआर कोडची संख्या २५० इतकी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भाजीबाजार पालिकेने नेमून दिलेल्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यासाठी तातडीने कारवाई करण्याचे आदेशही त्यानी दिले.