व्हीलचेअरमुळे दिव्यांग पोहोचले मतदान केंद्रांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 05:12 PM2019-10-21T17:12:14+5:302019-10-21T17:13:06+5:30
नाशिक : दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आलेल्या विविध प्रकारच्या सुविधांमुळे दिव्यांगांचा मतदानप्रक्रियेतील सहभाग वाढला असल्याचे ...
नाशिक : दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आलेल्या विविध प्रकारच्या सुविधांमुळे दिव्यांगांचा मतदानप्रक्रियेतील सहभाग वाढला असल्याचे दिसून आले. मॅपिंग करण्यात आलेल्या दिव्यांग मतदारांना आवश्यकतेनुसार व्हीलचेअर पुरविण्यात आल्याने मतदान केंद्रांपर्यंत पोहोचून दिव्यांगांना मतदान करणे सुलभ झाले.
दिव्यांग मतदारांना मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून दिव्यांगांना अनेकविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार दिव्यांगांना मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी सुमारे ४५० व्हीलचेअर्स आणि वाहनांची व्यवस्था असल्याने दिव्यांग बांधव मतदान केंद्रांवर पोहोचू शकले. जिल्ह्यातील काही भागात दिव्यांगांना आणण्यासाठी शासनाचे वाहन पाठविण्यात आले तर सेक्टर आॅफिसरच्या गाडीमधूनदेखील दिव्यांग मतदार मतदानासाठी आले. मागणी करण्यात आल्यानुसार दिव्यांगांना आणण्यासाठी व्हीलचेअर्सदेखील पाठविण्यात आल्या.अनेक सेवाभावी संस्थांनीदेखील व्हीलचेअरची सुविधा पुरवून दिव्यांग मतदारांना सहकार्य केले. शहरातील उर्दू हायस्कूल येथे सेवाभावी संस्थांच्या अनेक कार्यकर्त्यांनी केंद्रावर आलेल्या दिव्यांग मतदारांना मतदान कक्षापर्यंत पोहोचविले. केंद्रातील प्रवेशद्वारावर रॅम्पची व्यवस्था करण्यात आली होती. तर अंध मतदारास एक मदतनीस बरोबर नेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यांच्यासाठी ब्रेल मतपत्रिकादेखील देण्याची व्यवस्था करण्यात आली.