जागतिक महिला दिनानिमित्त महिला वकिलांची रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 10:26 PM2018-03-09T22:26:05+5:302018-03-09T22:26:05+5:30
नाशिक : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा न्यायालय, नाशिक बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला वकिलांची दुचाकी रॅली तसेच महिलादिनी कन्येस जन्म देणा-या महिलांना साडी व बालसंगोपनाचे साहित्य देऊन सत्कार करण्यात आला़
प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून या दुचाकी रॅलीस प्रारंभ झाला़ जिल्हा न्यायालयापासून मेहेर सिग्नल, महात्मा गांधी रोड, रेडक्रॉस सिग्नल, शालिमार, गाडगे महाराज पुतळामार्गे ही रॅली महानगरपालिकेच्या रुग्णालयात गेली. या ठिकाणी जागतिक महिलादिनी अर्थात ८ मार्च २०१८ रोजी ज्या महिलांनी कन्यारत्नास जन्म दिला अशा पाच महिलांना साडी चोळी व कन्यारत्नांना उपयोगी भेटवस्तू देऊन महिला वकील व सचिव एस. एम. बुक्के यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यानंतर ही रॅली शालिमार व सीबीएसवरून जिल्हा रुग्णालयात गेली. या ठिकाणी मुलींना जन्म देणाºया १३ महिलांचा साडी चोळी व उपयोगी साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.
दुचाकी रॅलीमध्ये नाशिक बार असोसिएशनच्या सदस्य अॅड़ श्यामला दीक्षित, अॅड़ पूनम शिंकर, अॅड़ वैष्णवी कोकणे, अॅड़ गीतांजली बागुल, अॅड़ नीलिमा साक्रे, अॅड़ उषा जाधव, अॅड़ कांजन पगारे, अॅड़ स्वाती पाटील, अॅड़ गरेवाल, अॅड़ विद्या चव्हाण, अॅड़ अंकिता उशारे, अॅड़ भारती ग्यर, अॅड़ स्वीटी, अॅड़ पूनम यादव, अॅड़ दोंदे आदींचा सहभाग होता. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. एम. बुक्के, उपाध्यक्ष अॅड़ प्रकाश अहुजा, अॅड़ शरद मोगल, अॅड़ कमलेश पाळेकर यांच्यासह ज्येष्ठ विधिज्ञ उपस्थित होते़
मुलींचा जन्मदर वाढावा
मुलींच्या जन्मदर दिवसेंदिवस खालावत चालला असून, यामुळे भविष्यात मोठे संकट उभे राहणार आहे़ समाजास तारक ठरणा-या महिला तसेच कन्यारत्नास जन्म देणा-या महिलांचा सत्कार करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे़ मुलींचा जन्मदर वाढविणे ही मातांसह सर्व समाजाची नैतिक जबाबदारी आहे़
- सूर्यकांत शिंदे, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश, नाशिक