शनिवारपासून जागतिक बालकामगार विरोधी सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 05:27 PM2021-06-11T17:27:08+5:302021-06-11T17:31:47+5:30
राज्याचे कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या निर्देशानुसार दि.12 ते दि.18 जून दरम्यान जागतिक बालकामगार विरोधी सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
नाशिक:- जागतिक बालकामगार विरोधी सप्ताह निमित्ताने जिल्ह्यात धाडसत्र राबवून विविध आस्थापनांची तपासणी करण्याबरोबरच अनेकविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती कामगार उपायुक्त विकास माळी यांनी दिली.
राज्याचे कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या निर्देशानुसार दि.12 ते दि.18 जून दरम्यान जागतिक बालकामगार विरोधी सप्ताह साजरा करण्यात येत आहे.या सप्ताहात कामगार उपआयुक्त विकास माळी,सहायक कामगार आयुक्त सुजित शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली ठक्कर बस स्थानक येथे बाल कामगार विरोधी स्वाक्षरी अभियान,जिल्ह्यातील विविध आस्थापनांना भेटी देऊन बाल कामगार विरोधीबाबत माहिती देऊन दुकाने आणि आस्थापनांच्या ठिकाणी दर्शनी भागात बालकामगार कामावर न ठेवण्याबाबतचे स्टीकर्स लावणे,पत्रके वाटप करणे, कामगार विभागातील अधिकारी कर्मचारी व सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी यांच्यामदतीने जिल्हातील वीटभट्टी, खडीक्रेशर,हॉटेल,दुकाने,चहाटपरी,गॅरेज यासह विविध आस्थापनांवर धाड टाकून तपासणी करणे,हॉटेल असोसिएशन,दुकाने व व्यापारी असोसिएशन यांच्या बरोबर बैठका घेऊन त्यांना सुधारित बालकामगार अधिनियमातील तरतुदींची माहिती देणे,औद्योगिक क्षेत्रातील मालक संघटनांची बैठक घेऊन बालकामगार कामावर न ठेवण्याबाबत सामुदायिक शपथ घेणे व त्यांच्याकडून हमी पत्र घेणे.आदी भरगच्च उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
आस्थापनामध्ये 14 वर्षापेक्षा लहान बाल कामगारांना कामावर ठेवणे गुन्हा आहे.तसेच 14 ते 18 वयोगटातील बालकामगारांना धोकादायक उद्योग व प्रक्रियेतील आस्थापनेत कामावर ठेवणे फौजदारी गुन्हा आहे.बाल कामगार कामावर ठेवल्यास सहा महिने ते दोन वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा किंवा 20 हजार ते 50 हजार रुपये दंड किंवा दोन्हीही शिक्षा मालकास होऊ शकतात. गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास किमान एक ते तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.