जागतिक आरोग्य संघटनेकडून रुबेला लसीकरणाची पाहाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 05:09 PM2018-12-04T17:09:15+5:302018-12-04T17:10:14+5:30
मोहिम : शिक्षण विभागावर महत्वाची जबाबदारी नाशिक : जिल्ह्याात सुरु असलेल्या गोवर व रूबेला लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी आलेल्या ...
मोहिम : शिक्षण विभागावर महत्वाची जबाबदारी
नाशिक : जिल्ह्याात सुरु असलेल्या गोवर व रूबेला लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी आलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधीने जिल्ह्यात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेबाबत समाधान व्यक्त करून या मोहिमेत आरोग्य विभागाबरोबरच शिक्षण विभागाची महत्वपूर्ण भूमिका असल्याने शिक्षण विभागाला मोहिमेत सहभागी करून घेण्याची सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्याकडे केली.
अमेरिका येथून जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य अधिकारी अॅलन सीवू हे गोवर व रूबेला लसीकरण मोहिमेबाबत माहिती घेण्यासाठी नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी सुरगणा येथील अतिदुर्गम भागातील शाळांना भेटी देवून लसीकरणाची माहिती घेतली. दुर्गम भागात मोहिमेस मिळत असलेल्या प्रतिसादाबाबत तसेच सर्व विभागांच्या समन्वयाने करण्यात आलेल्या नियोजनाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
जिल्हा परिषदेत सीवू यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांची भेट घेवून मोहिमेबाबत चर्चा केली. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यात सुरु असलेल्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. लसीकरणासाठी शिक्षण विभागाची भूमिका महत्वाची असल्याने मोहिमेच्या सनियंत्रणासाठी त्यांना मोहिमेत सहभागी करून घेण्याची सूचना केली. नाशिक जिल्ह्याने या मोहिमेचा सुक्ष्म आराखडा तयार केला असून सर्व प्रमुख विभागांना यामध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे.