आॅनलाईन बदली प्रक्रियेतील ‘त्या’ शिक्षकांची सुनावणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 08:31 PM2018-07-20T20:31:38+5:302018-07-20T20:41:12+5:30
: शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांच्या प्रक्रियेत संवर्ग-१ आणि संगर्व-२ मध्ये प्रशासनाची दिशाभूल करणारी माहिती दाखल करून सोयीची बदली पदरात पाडून घेणाऱ्या १६६ शिक्षकांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांच्यासामोर सुनावणी सुरू झाली असून पहिल्या दिवशी आठ तालुक्यांमधील शिक्षकांची सुनावणी पुर्ण करण्यात आली. शनिवारी उर्वरित तालुक्यांमध्ये शिक्षकांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
शिक्षकांच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेत अनेक शिक्षकांनी चुकीची माहिती भरून १६६ शिक्षकांनी सोयीच्या बदल्या मिळविल्याचे पडताळणीत समोर आल्याने या शिक्षकांची सुनावणी करण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या दालनात झालेल्या सुनावणीत बागलाण, चांदवड, देवळा, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, मालेगाव आणि नांदगाव तालुक्यातील शिक्षकांची गीते यांनी हजेरी घेतली. या शिक्षकांशी प्रत्यक्ष बोलून त्यांच्या कागदपत्रांच्या सतत्येविषयी तसेच बदलीअंतरातील तांत्रिक बाबी पडताळून पाहिल्याचे समजते. सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत सुनावणी प्रक्रिया सुरू होती. उद्या शनिवारी (दि.२१) रोजी उर्वरित तालुक्यातील शिक्षकांची सुनावणी होणार आहे.
या सुनावणीसाठी शिक्षणाधिकारी वैशाली झनकर तसेच गटशिक्षणाधिकारी, बांधकाम विभागाचे अभियंता, वैद्यकीय विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते.
दरम्यान, या सुनावणीत दोषींवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांच्यावर एक वेतनवाढ कायमस्वरुपी रोखण्याबरोबरच त्यांच्यावर पाच वर्ष अवघड क्षेत्रात काम करण्याची सक्तीची कारवाई होण्याची शक्यता शिक्षण विभागाने वर्तविली आहे.
--इन्फो-
सुनावणीनंतर शिक्षकांची नाराजी
सुनावणीसाठी जिल्हा परिषदेत आलेल्या शिक्षकांनी मात्र मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या सुनावणी कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत त्यांनी बाजू मांडण्यासाठी पुरेशी संधी दिली नसल्याचा आरोप करीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येक कागदपत्रांना खोटे ठरवत त्यांनी जास्त बोलल्यास अपात्र केले जाईल असा दम भरल्याचे काही शिक्षकांनी खासगीत बोलून दाखविले. सुनावणीत त्यांनी केवळ प्रत्यक्ष बोलविले असले तरी बोलण्याची संधी दिली नसल्याचे काही शिक्षकांचे म्हणणे आहे.