जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँक सभासदांना सात लाखांची कर्जसुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 11:26 PM2017-09-10T23:26:34+5:302017-09-10T23:35:14+5:30
नाशिक : सभासदांना पाच लाखांऐवजी सात लाख रुपयांचे कर्ज, नियमित कर्ज व्याजदरात अर्धा टक्के घट, शैक्षणिक कर्जात दुपटीने वाढ करून तीन लाख रुपये देण्याबरोबरच व्याजदरात दीड टक्क्यांची घट याबरोबरच सर्व सभासदांचा विमा काढण्याचा निर्णय नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रविवारी (दि़१०) घेण्यात आला़ प्रारंभी सभासदांचा विमा व संचालकांच्याजवळच्यांनाच कर्जवाटप केले जात असल्याचा आरोप काही सभासदांनी केला़
नवीन संचालक मंडळ व अध्यक्ष भाऊसाहेब खातळे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी परशुराम सायखेडकर सभागृहात बँकेची ९६वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली़ प्रास्ताविकात अध्यक्ष खातळे यांनी सांगितले की, बँकेची सभासदसंख्या १५ हजार १९४ आहे. १५० कोटी रुपयांच्या ठेवी, तर सभासदांना १०० कोटी रुपयांचे कर्जवाटप केलेले असून, बँकेचा एनपीए शून्य टक्के आहे़ सभेत गत वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त कायम करणे, वार्षिक अहवाल, नफा वाटणीस मंजुरी, पुढील वार्षिक अंदाजपत्रकास मंजुरी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली़
बँकेकडून केवळ कर्जदारांचा विमा काढण्याच्या प्रश्नावर आक्षेप घेण्यात येऊन विनाकर्जदारांचे काय चूक? असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर प्रत्येक सभासदाचा त्यांच्याच पैशातून ५० हजार रुपयांचा विमा काढण्याचा निर्णय घेण्यात आला़ सभासदाचा मृत्यूनंतर दिला जाणारा २५ हजार रुपये सहायता निधी बंद करून त्यासाठीचे १६ लाख ५० हजार रुपये लाभांश वाटप वा इतर खर्च करावा, असे ठरविण्यात आले़ सभासदांना सात लाख रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्याची अंमलबजावणी १ एप्रिल २०१८ पासून केली जाणार असून, नियमित कर्जाचे व्याजदार १३ टक्क्यांवरून १२़५० टक्के करण्यात आला़
शैक्षणिक कर्जमर्यादा तीन लाख करून व्याजदार १२ टक्क्यांहून १०़५० टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला़ तसेच बँकेच्या सभासदांच्या शेअर डिपॉझिटवर ४ टक्के, तर वर्गणी डिपॉझिटवर ९ टक्के लाभांश दिला जाणार आहे़ याची अंमलबजावणी २३ सप्टेंबरपासून केली जाणार आहे़ सभासद पाल्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी तज्ज्ञांची व्याख्याने तसेच साहित्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत़
यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष शिरीष भालेराव, संचालक विजयकुमार हळदे, सुधीर पगार, प्रशांत कवडे, प्रशांत गोवर्धने, अजित आव्हाड, सुनील बच्छाव, धनश्री कापडणीस, दिलीप मोरे आदी संचालक उपस्थित होते़.सभेच्या प्रारंभी मयत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली़ व्यवस्थापक अण्णासाहेब गडाख व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश क्षीरसागर यांनी अहवाल वाचन केले़