नाशिक : अमेरिकन नागरिक करणार पोलिओ लसीकरणाचे प्रबोधन
By admin | Published: January 28, 2017 09:24 PM2017-01-28T21:24:33+5:302017-01-28T21:26:16+5:30
शहरात पोलिओ निर्मूलनासाठी प्रयत्न करूनही पोलिओचे डोस घेण्यास नकार देणाऱ्या कुटुंबाचे प्रबोधन करण्यासाठी अमेरिकेतील १४ नागरिकांचे पथक दाखल झाले आहे.
ऑनलाइन लोकमत
मालेगाव (नाशिक), दि. २८ - शहरात पोलिओ निर्मूलनासाठी प्रयत्न करूनही पोलिओचे डोस घेण्यास नकार देणाऱ्या कुटुंबाचे प्रबोधन करण्यासाठी कॅलिफोर्नियास्थित १४ रोटरीयन्सचे पथक मालेगावी दाखल झाले.
शहरातील विविध भागात जाऊन ७ टीमच्या माध्यमातून उद्या रविवारी आणि सोमवारी ३० जानेवारी रोजी दोन दिवस लहान मुला-मुलींना पोलिओचे डोस देण्यात येणार आहेत. यासाठी मनपा आयुक्त रवींद्र जगताप, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहावर कॅलिफोर्नियातून आलेल्या रोटरियन्सच्या उपस्थितीत बैठक घेवून दोन दिवसांच्या कामांचे नियोजन करण्यात आले.
प्रारंभी अमेरिकेतील शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना स्लाईड शोचे प्रेझेंटेशन सादर करून पोलिओ निर्मूलनाची जगातील माहिती दिली. पोलिओ निर्मूलनासाठी करण्यात येणारे प्रयत्न आणि पोलिओचे रूग्ण कसे कमी करत आलो हे सांगत आपल्या समस्या मांडल्या. त्यात ‘मालेगाव’ला पोलिओ निर्मूलनाबाबत जगात असलेले महत्व त्यांनी विशद केले.
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. प्रकाश नंदपूर्णकर यांनी मालेगावात पोलिओबाबत असलेली माहिती देत पथकाचे स्वागत केले. पोलिओ निर्मूलनासाठी करण्यात येणारे प्रयत्न आणि अडचणी यांची माहिती अमेरिकन शिष्टमंडळापुढे मांडली. यावेळी डॉ. दिलीप भावसार, विजय पोफळे, डॉ. सूर्यवंशी आदिंसह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दोन दिवसांच्या या कार्यात भारत भेटीवर आलेले अनिल गर्ग, गीफ्टसन रूथ, ब्राऊन हेलेन, जोबर स्टीफन, मॅकमर्थ डोलर्स, कुपर स्कॉट, बेरींजन कॅथरिन, कोल मॉर्जोरी, ग्रासमॅन रिचर्ड, हेज रोंदा, हटन सिंधीया, मॅलडोनाल्डो लोरेना, मॅककंबर्स डोलेरस, व्हेकफील्ड शेरील हे ह्या सात केंद्रांचे प्रमुख आहेत.