नाशिकला वडाळापाठोपाठ श्रमिकनगर झोपडपट्टीतील रहिवाशांना स्थलांतरीत करण्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 03:44 PM2018-01-01T15:44:30+5:302018-01-01T15:48:19+5:30
महापालिका : ११ जानेवारीला सोडत काढण्याचा निर्णय
नाशिक - महापालिकेने वडाळा पाठोपाठ आता गंजमाळवरील श्रमिनगरमधील लाभार्थी रहिवाशांना स्थलांतरीत करण्याची तयारी चालविली असून येत्या ११ जानेवारीला सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती झोपडपट्टी विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, श्रमिकनगरातील लाभार्थ्यांना चुंचाळे शिवारातील घरकुल योजनेत समाविष्ट करून घेतले जाणार आहे.
महापालिकेने मागील महिन्यात वडाळा येथील झोपडपट्टी जमिनदोस्त करण्याची कार्यवाही पार पाडली. वडाळा येथील घरकुल योजनेत लाभ देऊनही रहिवाशांनी आपल्या मूळ झोपड्या सोडल्या नव्हत्या. त्यामुळे महापालिकेने सदर झोपड्या हटविण्यासंबंधी लाभार्थ्यांना वारंवार नोटीसाही बजावल्या होत्या. परंतु, लाभार्थी नोटिशांना बधत नव्हते. अखेर महापालिकेने सुमारे ४०० हून अधिक झोपड्यांवर जेसीबी चालवत संपूर्ण अतिक्रमण हटविले. वडाळानंतर आता महापालिकेने गंजमाळवरील श्रमिकनगर झोपडपट्टीकडे मोर्चा वळविला आहे. श्रमिकनगरातील सुमारे ३०० लाभार्थ्यांना चुंचाळे येथे घरकुले निश्चित करण्यात आलेली आहेत. परंतु, लाभार्थी आपल्या झोपड्या सोडायला तयार नाहीत. त्यामुळे महापालिकेने वडाळाप्रमाणेच बळाचा वापर करण्याची तयारी चालविली असतानाच हळूहळू लाभार्थी स्थलांतरणास तयार होताना दिसून येत आहे. अनेकांनी महापालिकेत स्वत: संपर्क साधून तशी तयारी दर्शविली आहे. त्यानुसार, महापालिकेमार्फत येत्या ११ जानेवारीला सोडत काढली जाणार असून लाभार्थ्यांनी निश्चित केलेल्या यादीनुसार सोबत आवश्यक ती कागदपत्रे आणून सोडतीत सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी केले आहे. दरम्यान, चुंचाळे येथे स्थलांतरीत करण्याऐवजी वडाळा येथे स्थलांतरीत करण्याची मागणी काही लाभार्थ्यांनी केली आहे. परंतु, महापालिका चुंचाळे येथील घरकुल योजनेतच स्थलांतरणावर ठाम आहे.
१७५ लाभार्थ्यांची सोडत
महापालिकेने चुंचाळे येथे सर्वात मोठी घरकुल योजना उभारलेली आहे. मागील सप्ताहात चुंचाळे येथील घरकुल योजनेत १७५ लाभार्थ्यांची सोडत काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. चुंचाळे येथे अद्याप सातशेहून अधिक घरकुले रिकामी आहेत. रिक्त घरकुलांमध्येही टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांना स्थलांतरीत करण्यात येणार आहेत.