नाशिकमध्ये प्रणयकाळातील सर्पांची झुंज बघून व्हाल थक्क!
By azhar.sheikh | Published: March 28, 2018 04:08 PM2018-03-28T16:08:49+5:302018-03-28T16:08:49+5:30
नाशिक : सध्या उन्हाळा तापला असून हा काळ सर्पांच्या विविध प्रजातींचा प्रणयाचा मानला जातो. सर्प हा असा एकमेव सरपटणारा प्राणी आहे, की त्याला कुठल्याही प्रकारचा आवाज नसतो. त्यामुळे प्रणयाची इच्छा पुर्ण करण्यासाठी मादी नैसर्गिकरित्या एकप्रकारचा गंध वास्तव्य असलेल्या भागातील वातावरणात सोडते. या गंधाकडे त्या परिसरातील नर जातीचा सर्प आकर्षित होऊन मादिचा शोध घेतो. यावेळी त्या भागात एकापेक्षा अधिक नर जातीचे सर्प असल्यास त्यांच्यात मादीची जागा मिळविण्यासाठी प्रणयपुर्व झुंज पहावयास मिळते. नाशिकमधील हनुमानवाडी भागात अशाच प्रकारे थक्क करणारी धामण प्रजातीच्या सर्पांची झुंज बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
नर सर्प एकमेकांशी झुंज देऊन परस्परांना पराजित करण्याचा प्रयत्नात असतात. अशी झुंज नैसर्गिक नाल्याच्या काठावर, गवताळ भागात, अडगळीच्या ठिकाणी नजरेस पडते अन् तेथे नागरिकांची गर्दी जमते. मुळात ही दोन नरांमध्ये सुरू असलेली विजय-पराजयाची झुंज असते; मात्र नागरिकांना ते सर्पांचे मीलन वाटते आणि विविध अंधश्रध्दा व गैरसमाजापोटी बघ्यांची गर्दी वाढत जाते तर काही लोक पांढरा किंवा लाल कपडा शोधत त्या सर्पांच्या अंगावर फेकण्याचा प्रयत्न करतात; अशावेळी हा प्रयत्न त्यांच्या अंगावरही बेतू शकतो. त्यामुळे नागरिकांनी असा कुठलाही प्रयत्न यावेळी न केलेला बरा. कारण दोन्ही नर सर्पांमध्ये एकमेकांना पराजय करण्यासाठी आक्रमकता वाढलेली असते, अशावेळी त्यांना नागरिकांच्या अशा कापड फेक किंवा फोटोसेशनसाठी डिवचणे महागात पडू शकणारे आहे. सर्पांना असुरक्षिततेची जाणीव झाल्यास त्यांच्याकडून दंश होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अशावेळी सर्पांभोवती गर्दी करणे टाळावे, असे आवाहन इको-एको फाऊण्डेशनचे सदस्य व सर्प अभ्यासक अभिजीत महाले यांनी केले आहे.