लाचेची मागणी करणाऱ्या आहेरगावच्या तलाठ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 09:41 PM2018-03-23T21:41:31+5:302018-03-23T21:41:31+5:30
नाशिक : सातबारा उता-यावर आणेवारी लावण्यासाठी सात हजार रुपयांची मागणी करून ती स्वीकारणारा निफाड तालुक्यातील पाचोरेवणी सजा आहेरगाव येथील तलाठी लोकसेवक संजय संतू गांगोडे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि़ २३) रंगेहाथ पकडले़

आहेरगाव सजामधील शेतजमिनीच्या सातबारा उता-यावर आणेवारी लावण्यासाठी तक्रारदार तलाठी गांगोडे यांच्याकडे गेले असता त्यांनी सात हजार रुपयांची मागणी केली़ मात्र तडजोडीअंती पाच हजार रुपये काम होण्यापूर्वी व उर्वरित एक हजार रुपये सातबारा उतारा घेण्याच्या दिवशी असे सहा हजार रुपये देण्यास सांगितले़ त्यानुसार पाच हजार रुपये दिल्यानंतर तक्रारदार सातबारा उतारा घेण्यासाठी तलाठी गांगोडे यांच्याकडे गेला असता त्यांनी उर्वरित एक हजार रुपयांची मागणी केली़ यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता तक्रारीच्या पडताळणीनंतर शुक्रवारी सापळा रचण्यात आला़
त्यानुसार तक्रारदार शुक्रवारी पिंपळगाव येथील तलाठी कार्यालयात सातबारा उतारा घेण्यासाठी गेले़ या ठिकाणी लोकसेवक तलाठी संजय गांगोडे याने तक्रारदाराकडे एक हजार रुपयांची मागणी करून ही रक्कम स्वीकारताच त्याला रंगेहाथ पकडण्यात आले़ या प्रकरणी तलाठी गांगोडेविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़