नाशिककर अडकले वाहनांच्या गराड्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 01:03 AM2018-11-27T01:03:07+5:302018-11-27T01:04:02+5:30
अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका यादरम्यान स्मार्ट रस्त्याचे काम सुरू झाल्याने एकेरी मार्गाचा फटका नाशिककरांना बसत आहे. एकेरी मार्गाचे नियोजन फसल्याने या वाहतुकीचा ताण गोळे कॉलनीमधील अंतर्गत रस्ते, वकीलवाडी, रविवार कारंजा, घनकर गल्ली, पोलीस आयुक्तालय मार्ग, घारपुरे घाट रस्ता, टिळकवाडी सिग्नल, कॅनडा कॉर्नर, शालिमार चौक, जीपीओरोड, द्वारका, भाभानगर या भागातील रस्त्यांवर आला होता. वरील ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होऊन नागरिकांना तासन् तास वाहनांच्या गराड्यात प्रतीक्षा करावी लागली.
नाशिक : अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका यादरम्यान स्मार्ट रस्त्याचे काम सुरू झाल्याने एकेरी मार्गाचा फटका नाशिककरांना बसत आहे. एकेरी मार्गाचे नियोजन फसल्याने या वाहतुकीचा ताण गोळे कॉलनीमधील अंतर्गत रस्ते, वकीलवाडी, रविवार कारंजा, घनकर गल्ली, पोलीस आयुक्तालय मार्ग, घारपुरे घाट रस्ता, टिळकवाडी सिग्नल, कॅनडा कॉर्नर, शालिमार चौक, जीपीओरोड, द्वारका, भाभानगर या भागातील रस्त्यांवर आला होता. वरील ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होऊन नागरिकांना तासन् तास वाहनांच्या गराड्यात प्रतीक्षा करावी लागली. भर उन्हात वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या गलथान काराभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.
कान्हेरेवाडीचा मार्ग बंद करावा लागेल
आदर्श संस्थेची विद्यार्थी संख्या मोठी असल्यामुळे विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या सुमारे दोनशे वाहनांना उभे राहण्यासाठी जागा उपलब्ध होणे कठीण झाले आहे. त्यामुळे संस्थाचालकांनी कान्हेरेवाडीमधील रस्त्यावर परवानगी पोलिसांकडे मागितली आहे. मात्र अद्याप त्या मागणीबाबत विचार झालेला नाही. कान्हेरेवाडीपर्यंत विद्यार्थ्यांना पायपीट करत यावे लागणार आहे; मात्र त्यास नाईलाज असून, पोलिसांनी किमान कान्हेरेवाडीमध्ये तरी वाहने उभी करण्यास परवानगी द्यावी व भालेकर मैदानाकडून कान्हेरेवाडीतून येणारी वाहतूक शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेस थांबवावी, अशी मागणी शाळेचे संचालक, शिक्षक व पालकांनी केली आहे.
‘त्या’ व्यक्तींवर पोलिसांची मेहेरनजर
एकेरी वाहतुकीमुळे रविवार कारंजा चौकावर ताण निर्माण झालेला असताना शहर वाहतूक पोलिसांकडून नियोजनही ‘स्मार्ट’ पध्दतीने होणे गरजेचे होते. मात्र दुर्दैवाने तसे होऊ शकले नाही, परिणामी वाहतूक व्यवस्थेचा फज्जा उडाल्याचे चित्र शहरात सोमवारी प्रमुख रस्त्यांवर तसेच चौकाचौकात दिसले. रविवार कारंजावर एका बॅँकेच्या निवडणुकीनिमित्त राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधींसह ‘बड्या’ व्यक्तींची गर्दी जमली होती. यावेळी त्यांची वाहने सर्रासपणे बेशिस्तपद्धतीने उभी करण्यात आल्याने वाहतूक कोंडीत भर पडली; मात्र पोलिसांनी त्यांच्यावर मेहेरनजर दाखविणे पसंत केले. एरवी ‘पिवळ्या पट्ट्या’चा नियम पाळत सर्वसामान्यांची वाहने उचलून नेण्याची कारवाई करणाºया पोलिसांनी यावेळी काणाडोळा केला. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या काराभाराविषयी व स्वत:ला लोकप्रतिनिधी म्हणून घेणाºयांविषयी तीव्र संताप व्यक्त केला.
शालेय विद्यार्थ्यांसह पालकांची कसरत
एकेरी वाहतुकीच्या निर्णयामुळे सीबीएस परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले. पालकांना विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करताना कसरत करावी लागली. कान्हेरेवाडी कॉर्नरवर पालकांसह शालेय वाहतूक करणाºया वाहनचालकांनी वाहने उभी करून विद्यार्थ्यांची चढ-उतार केली. यावेळी पायपीट करत बॅरिकेड टाकून बंद करण्यात आलेल्या रस्त्यामधील अडथळ्यांची शर्यत पार करत विद्यार्थ्यांनी शाळेचा उंबरा गाठला. त्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली.