नाशिककरांना जाणवू लागली गुलाबी थंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 01:38 AM2018-11-16T01:38:20+5:302018-11-16T01:38:45+5:30
दोन दिवसांपूर्वी शहराच्या किमान तपमानाचा पारा अचानकपणे ११.५ अंशांपर्यंत घसरल्याने नाशिककरांनी थंडीचा कडाका अनुभवला. थंडीचे दमदार आगमन झाले म्हणून उबदार कपड्यांचा वापरही सुरू केला; मात्र पुन्हा पारा चढू लागल्याने सध्या नाशिककरांना गुलाबी थंडीचा अनुभव येऊ लागला आहे.
नाशिक : दोन दिवसांपूर्वी शहराच्या किमान तपमानाचा पारा अचानकपणे ११.५ अंशांपर्यंत घसरल्याने नाशिककरांनी थंडीचा कडाका अनुभवला. थंडीचे दमदार आगमन झाले म्हणून उबदार कपड्यांचा वापरही सुरू केला; मात्र पुन्हा पारा चढू लागल्याने सध्या नाशिककरांना गुलाबी थंडीचा अनुभव येऊ लागला आहे.
यावर्षी थंडीचे आगमन उशिराने झाले. परतीच्या पावसाने ओढ दिल्यामुळे थंडीची तीव्रता अद्यापही अधिक जाणवत नाही; मात्र मंगळवारी (दि.१३) अचानकपणे पारा ११.५ अंशांपर्यंत घसरला होता. तरीदेखील कमाल तपमान मात्र तिशीपार नोंदविले गेल्याने सकाळी सात वाजेनंतर थंडीची तीव्रता कमी झालेली दिसून आली. बुधवारी १२.२ तर गुरुवारी (दि.१५) १३ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले. त्यामुळे थंडीची तीव्रता पुन्हा कमी झाल्याचे जाणवले. तरीदेखील राज्यात प्रमुख शहरांमध्ये नोंदविण्यात आलेल्या किमान तपमानात नाशिकचा समावेश आहे. नाशिक, जळगाव, औरंगाबाद, परभणी, नागपूर या शहरांमध्ये १३ अंश इतक्या कमी तपमानाची नोंद भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. महाबळेश्वरमध्ये १६ तर साताऱ्यात १४.५ इतके तपमान नोंदविले गेले.