उंच झेपावणाऱ्या पतंगांना नाशिककरांनी दिला ढिल
By admin | Published: January 15, 2017 01:13 AM2017-01-15T01:13:40+5:302017-01-15T01:13:54+5:30
पतंगोत्सव : संगीत साथीने तरुणाईने लुटली मौज
नाशिक : शहरातील लहान-थोरांसह बहुतेक नाशिककरांनी मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यास प्राधान्य देत घातक नायलॉनच्या मांजाचा वापर टाळून संक्रांत गोड करण्याचा प्रयत्न केला. अपवाद वगळता बहुतेक सर्व नाशिककरांनी नायलॉन मांजाऐवजी साधा मांजा वापरून आकाशात उंच उंच झेपावणाऱ्या विविध रंगांच्या पतंगांना ढिल देत विविध प्रकारच्या संगीताच्या साथीने पतंगबाजीचा आनंद लुटला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शहरात थंडीचा कडाका असतानाही अनेकांनी सूर्योदयापासूनच पतंगबाजीला सुरुवात केल्याचे दिसून आले.
पतंगबाजांनी सकाळपासूनच पतंग उडविण्यासाठी मोकळी मैदाने, इमारतीची गच्ची आदि खुल्या जागांवर तळ ठोकला होता. मकरसंक्र ांतीचा सूर्य डोक्यावर येत असताना नाशिककरांच्या पतंगबाजीलाही उधाण आल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी लोकांनी छतावर एकत्र जमून डीजेच्या तालावर पतंग उडविले. चव्हाटा, जुने नाशिक, गोदाघाट, पंचवटी, रामवाडी या ठिकाणी पतंग उडविताना नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. अनेकांनी तपोवन, डोंगरे वसतिगृह मैदान यांसारख्या खुल्या जागी जाऊन पतंग उडविण्याची मौज लुटली. दुसरीकडे नायलॉन मांजामुळे आणि पतंग उडविताना अपघात होऊ नये म्हणून पोलीस शहरातील ठिकठिकाणी बारीक नजर ठेवून होते. परंतु नागरिकांमध्ये विविध माध्यमातून नायलॉन मांजाविरोधात करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे शहरात अनेकांनी साध्या मांजानेच पतंग उडविणे पसंत केले. गेल्या काही दिवसांत नायलॉन मांजामुळे काही भागात एकामागून एक अपघात घडले असतानाही वेगवेगळ्या पतंग व्यावसायिकांकडून विक्री सुरूच होती. परंतु, मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई करून नायलॉन मांजा विक्रेत्यांवर जरब बसविण्यात यश मिळविल्याचे पहावयास मिळाले. मकरसंक्र ांती सणाचा पतंग हा महत्त्वाचा भाग असून, लहान मुले अधिक रस घेत असताना पालकांनी त्यांच्या सुरक्षिततेलाही सर्वाधिक प्राधान्य दिल्याचे दिसून आले. जाणते नाशिककर तथा पालकवर्ग यांनी जिवघेण्या रसायनांनी बनलेला मांजा खरेदी करणेच टाळले. (प्रतिनिधी)