मराठी कलावंतांकडून नाशिकचे कौतुक

By admin | Published: January 18, 2017 12:25 AM2017-01-18T00:25:10+5:302017-01-18T00:25:28+5:30

‘राज’ पर्यटन : शस्त्र संग्रहालय, बॉटनिकल गार्डन बघून सर्वच भारावले

Nasik's appreciation from Marathi artists | मराठी कलावंतांकडून नाशिकचे कौतुक

मराठी कलावंतांकडून नाशिकचे कौतुक

Next

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या विकासकामांचे ‘ब्रॅण्डिंग’ सध्या मनसेचे राज ठाकरे यांनी सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून ठाकरे यांच्या विशेष निमंत्रणावरून मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ व नवोदित कलावंतांनी नाशिकची वारी मंगळवारी (दि.१७) केली. यावेळी सर्वच कलावंतांनी विविध प्रकल्पांना भेटी देत ठाकरे संकल्पनेचे ‘मनसे’ कौतुक केले. मोठे गृहप्रकल्प, उड्डाणपूल, रस्ते, उद्याने हे सर्वच शहरांमध्ये असतात कारण या मूलभूत गरजा आहे. या गरजा पूर्ण झाल्या म्हणजे सर्वांगीण विकास झाला असे मुळीच नाही. शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून लोकाभिमुख प्रकल्पनिर्मितीला कलेची जोड देऊन शहराचा सर्वांगीण विकास साधता येऊ शकतो, असे मत कलावंतांनी ‘नाशिक वारी’मधून व्यक्त केले. लोकाभिमुख प्रकल्पांच्या पाहणी दौऱ्यासाठी राज ठाकरे यांनी सुमारे पंचवीस ते तीस कलावंतांना नाशिकची ‘मनसे’वारी घडविली.  नाशिक फर्स्टमार्फत साकारलेले ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क, नेहरू वनोद्यानातील बॉटनिकल गार्डन, अहल्यादेवी होळकर पुलावरील वॉटर क र्टन, शंभर फुटी रंगीबेरंगी कारंजा, बाळासाहेब ठाकरे स्मारक तथा ऐतिहासिक संग्रहालय आणि उड्डाणपुलाखालील सुशोभीकरण या सिनेसृष्टीच्या टीमने न्याहाळले. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास कलावंतांचे मुंबईनाका येथील ट्रॅफिक एज्युकेशन चिल्ड्रेन पार्क येथे आगमन झाले. कलावंतांनी संपूर्ण पार्कमध्ये फेरफटका मारत सुरक्षित वाहतुकीचे जणू धडे समजावून घेतले. तेथून कलावंतांची बस गंगापूररोडवरील बाळासाहेब ठाकरे स्मारक तथा ऐतिहासिक संग्रहालयाच्या दिशेने निघाली. संग्रहालयात प्रवेश करताच कलावंत हरखून गेले. प्रवेशद्वारावरच उभारण्यात आलेल्या दीपमाळ व गजराजच्या प्रतिकृतींभोवती सर्वांनी ‘सेल्फी’ घेतले. त्यानंतर संग्रहालयातील शिवकालीन तलवारी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकर्षक चित्राकृती न्याहाळत महाराजांच्या सामर्थ्यशाली इतिहासाच्या स्मृतींना उजाळा दिला. संध्याकाळी साडेसहा वाजता कलावंतांची बस गोदाकाठावर पोहचली. येथील होळकर पुलावरील वॉटर कर्टन आणि गोदापात्रातील शंभरफुटी कारंजाचे सौंदर्य बघून मराठी कलावंत अवाक् झाले.
यांची होती उपस्थिती
ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर, विद्याधर जोशी, दिग्दर्शक रवि जाधव, मेधा मांजरेकर, संजय नार्वेकर, नागेश भोसले, वैभव मांगले, जितेंद्र जोशी, सागर कारंडे, पुष्कर श्रोत्री, सिद्धार्थ जाधव, अनिकेत विश्वासराव, सायली संजीव, मेघा धाडे, सविता मालवेकर, मयुरा पालांडे, परी तेलंग, माधवी नेमकर, आनंद इंगळे आदिंनी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यासमवेत नाशिकचे ‘मनसे’ पर्यटन केले.







 

Web Title: Nasik's appreciation from Marathi artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.