नाशिकच्या गाड्या सुरळीत सुरू

By admin | Published: August 5, 2015 10:23 PM2015-08-05T22:23:34+5:302015-08-05T22:25:44+5:30

रेल्वे अपघात : मध्य प्रदेशातील घटनेमुळे रेल्वेसेवा विस्कळीत

Nasik's trains continue to operate smoothly | नाशिकच्या गाड्या सुरळीत सुरू

नाशिकच्या गाड्या सुरळीत सुरू

Next

नाशिकच्या गाड्या सुरळीत सुरूनाशिकरोड : मध्य प्रदेशातील हरदा रेल्वेस्थानकाजवळ मंगळवारी मध्यरात्री कामायनी व जनता एक्स्प्रेस या रेल्वे गाड्यांना अपघात झाल्याने मध्य प्रदेशातून मुंबईकडे जाणाऱ्या चार गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या अपघाताचा नाशिकच्या गाड्यांवर कोणताही परिणाम झाला नसून भुसावळ-मुंबई मार्ग सुरळीत सुरू आहे. मात्र लांब पल्ल्याच्या गाड्या सुमारे चार तास विलंबाने धावत आहेत.
मध्य प्रदेशातील हरदा रेल्वे स्थानकाच्या २० किलोमीटर अगोदर कालीमचक नदी रेल्वे पुलाचा काही भाग मंगळवारी मध्यरात्री मुसळधार पावसामुळे वाहून गेला होता. यामुळे मुंबई-वाराणसी-कामायनी एक्स्प्रेस ही मंगळवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास कालीमचक रेल्वे नदी पुलावरून जात असताना रेल्वे मार्ग उखडला. यामुळे पाच बोग्या या नदीत जाऊन पडल्या, तर काही डबे रेल्वे मार्गावरून घसरले. या अपघातानंतर काही वेळातच जबलपूर-मुंबई जनता एक्स्प्रेस ही पण त्याच ठिकाणी रेल्वे रुळावरून घसरून अपघातग्रस्त झाली. मध्यरात्री मुसळधार पावसामुळे मदतकार्यात मोठी अडचण निर्माण झाली होती. या अपघातामुळे भुसावळ ते इटारसी रेल्वेसेवा बुधवारीदेखील ठप्प झालेली होती.
या अपघातामुळे बुधवारी सुटणारी जबलपूर-मुंबई गरीबरथ व हबीबगंज-एलटीटी व उद्या गुरुवारी सुटणारी मुंबई-जबलपूर गरीबरथ व एलटीटी-हबीबगंज या चार गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर मुंबईहून भुसावळमार्गे इटारसी जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या या मुंबईवरून नाशिकरोड, भुसावळ, नागपूर मार्गे इटारसीहून पुढे जात व येत आहे. दरम्यान, नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या पंचवटी, गोदावरी, तपोवन एक्स्प्रेस गाड्या सुरळीत सुरू आहेत.
गेल्या तीन-चार महिन्यांपासून मध्य रेल्वेच्या मार्गावर वारंवार काही दुर्घटना घडत असल्याने रेल्वे प्रशासन व प्रवासी प्रचंड त्रस्त झाले आहेत. इटारसी येथील रूट रिले इंटरलॉकिंग पॅनलला लागलेली आग, मुंबई-ठाणे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोलमडलेली अ‍ॅटोमॅटीक सिग्नल यंत्रणा, इगतपुरी रेल्वेस्थानकात मालगाडीचे घसरलेले डबे अशा घटनांमुळे रेल्वे सेवेवर विपरीत परिणाम झाला होता. यामुळे अनेक रेल्वे काही दिवस रद्द ठेवून रेल्वे प्रशासनाला मोठ्या परिश्रमानंतर रेल्वेसेवा पूर्वपदावर आणता आली होती.
आता पुन्हा मध्य प्रदेशातील हरदा रेल्वेस्थानकाजवळ झालेल्या अपघातामुळे रेल्वे प्रशासन हादरून गेले आहे. किमान दोन-तीन दिवस रेल्वेसेवा पूर्वपदावर आणण्यासाठी लागतील, असा अंदाज रेल्वेच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: Nasik's trains continue to operate smoothly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.