नासाका, निसाका भाडेतत्त्वावर चालविण्याचे प्रयत्न

By श्याम बागुल | Published: September 22, 2018 03:30 PM2018-09-22T15:30:13+5:302018-09-22T15:41:07+5:30

नाशिक सहकारी कारखान्याकडे जिल्हा बॅँकेचे १५७, तर निफाड सहकारी कारखान्याकडे १२५ कोटी रुपये कर्ज गेल्या अनेक वर्षांपासून थकले असून, कर्जबाजारीपणा, खेळत्या भांडवलाचा अभाव, कर्मचाऱ्यांच्या देणी यामुळे आर्थिकदृष्ट्या जर्जर झालेले हे दोन्ही कारखाने गेल्या काही वर्षांपासून बंद पडले

Nassaka, Nissaka lease attempt | नासाका, निसाका भाडेतत्त्वावर चालविण्याचे प्रयत्न

नासाका, निसाका भाडेतत्त्वावर चालविण्याचे प्रयत्न

Next
ठळक मुद्देदोन कंपन्यांची तयारी : अनामत भरण्यास चालढकल एका कंपनीने काही दिवसांची मुदतवाढीची मागणी

नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेले, परंतु शासनाच्या निर्बंधामुळे विक्रीही न करता येऊ शकलेल्या जिल्ह्यातील नाशिक व निफाड सहकारी साखर कारखाने आता भाडेतत्त्वावरच चालविण्यास देऊन त्यातून कर्जवसुली करण्याचे प्रयत्न नाशिक जिल्हा बॅँकेने सुरू केले असून, त्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. दोन्ही कारखान्यांसाठी चार खासगी कंपन्यांनी तयारी दर्शविली असली तरी, पाच ते सहा कोटी रुपये अनामत भरण्यास या कंपन्यांनी असमर्थता व्यक्त केल्याने त्यांना मुदतवाढ देऊन प्रतीक्षा केली जात आहे.
नाशिक सहकारी कारखान्याकडे जिल्हा बॅँकेचे १५७, तर निफाड सहकारी कारखान्याकडे १२५ कोटी रुपये कर्ज गेल्या अनेक वर्षांपासून थकले असून, कर्जबाजारीपणा, खेळत्या भांडवलाचा अभाव, कर्मचाऱ्यांच्या देणी यामुळे आर्थिकदृष्ट्या जर्जर झालेले हे दोन्ही कारखाने गेल्या काही वर्षांपासून बंद पडले आहेत. कारखान्यांकडून कर्ज वसुलीचे सारे प्रयत्न निष्फळ ठरल्याने अखेर जिल्हा बॅँकेने दोन्ही कारखाने थकबाकीपोटी मालमत्तेसह जप्त केले आहेत. त्यामुळे कारखान्याकडे असलेल्या थकबाकीवर जिल्हा बॅँकेच्या चक्रवाढ व्याजाचा डोंगर दिवसागणिक वाढत चालला असून, शिवाय कारखाना सुरू करण्यासाठी करण्यात आलेले राजकीय व शासकीय प्रयत्नही अनेक वेळा फसल्यामुळे बॅँकेने कारखाना विक्री करून आपली वसुली करण्यासाठी वेळोवेळी जाहिराती काढल्या, परंतु त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. याच दरम्यान, काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने सहकारी साखर कारखाने, सहकारी संस्थांच्या लिलावाद्वारे विक्रीवर निर्बंध लादल्यामुळे बॅँकेने विक्रीचा निर्णय बदलून कारखाने भाडेतत्त्वावर चालविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यासाठी गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यापासून राज्यपातळीवरील खासगी कंपन्यांना पाचारण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठीदेखील दोन ते तीन वेळेस निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. दोन्ही कारखान्यांसाठी प्रत्येकी दोन दोन कंपन्यांनी तयारी दर्शविली. या कंपन्यांना आहे त्या परिस्थितीत कारखाना चालविण्यासाठी घेऊन जुने देणी बँकेने अदा करण्याच्या बोलीवर कारखाना त्यांच्या ताब्यात देण्याचे ठरले, परंतु त्यासाठी भाड्याचे अडीच कोटी व अडीच कोटी रुपये आगावू अनामत रक्कम बॅँकेकडे जमा करण्याची अट घालण्यात आली. अनामत रकमेच्या आकड्यावरून बहुधा खासगी कंपन्यांनी आपला हात अखडता घेतला असून, त्यांच्याशी बॅँकेने वारंवार संपर्क साधूनही पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यातील एका कंपनीने काही दिवसांची मुदतवाढीची मागणी केल्याने बॅँक आशेवर आहे.

Web Title: Nassaka, Nissaka lease attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.