रंगीबेरंगी रानफुलांच्या पीतांबरीने नटली सृष्टी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 09:10 PM2020-07-25T21:10:07+5:302020-07-26T00:21:33+5:30
पेठ : बालकवींच्या फुलराणी कवितेतील या ओळी ऐकल्या की, मानवी मन थेट धाव घेते ते फुलाफुलांत. ग्रामीण निसर्गात वर्षभर असंख्य फुले फुलतात. त्यात सर्वच ऋतूंमध्ये वेगवेगळी फुले आपला रंग दाखवत असतात; पण पावसाळ्यातील रंगोत्सव काही वेगळाच आनंद देणारा असतो. पावसाची चाहूल लागली की, वसुंधरा जणू सज्ज होते निसर्गाकडून आपला शृंगार करून घेण्यासाठी. आणि निसर्गदेखील मुक्त हस्ताने आपल्या जादूच्या पोतडीतून वेगवेगळी फुले, पाने, फुलपाखरे, कीटक एक ना दोन सगळ्याच गोष्टींची उधळण करून वसुंधरेचा शृंगार करतो.
पेठ : हिरवे हिरवे गार गालिचे
हरित तृणांच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती
फुलराणी ही खेळत होती...
बालकवींच्या फुलराणी कवितेतील या ओळी ऐकल्या की, मानवी मन थेट धाव घेते ते फुलाफुलांत. ग्रामीण निसर्गात वर्षभर असंख्य फुले फुलतात. त्यात सर्वच ऋतूंमध्ये वेगवेगळी फुले आपला रंग दाखवत असतात; पण पावसाळ्यातील रंगोत्सव काही वेगळाच आनंद देणारा असतो.
पावसाची चाहूल लागली की, वसुंधरा जणू सज्ज होते निसर्गाकडून आपला शृंगार करून घेण्यासाठी. आणि निसर्गदेखील मुक्त हस्ताने आपल्या जादूच्या पोतडीतून वेगवेगळी फुले, पाने, फुलपाखरे, कीटक एक ना दोन सगळ्याच गोष्टींची उधळण करून वसुंधरेचा शृंगार करतो.
आधुनिकीकरणाच्या नावाखाली उभ्या झालेल्या सिमेंटच्या जंगलात हे सहज जाणवत नसलं तरी प्रत्यक्ष खऱ्याखुºया डोंगरदºयात विसावलेल्या निसर्गात गेलात तर या चमत्कारिक दुनियेचा नक्की आनंद घेता येईल. एरव्ही आपल्याशी हितगूज करणारे जंगल आता हसत असतं, नाचत असतं आणि गातदेखील असतं तेही वेगवेगळ्या फुलांच्या माध्यमातून. मानवी मनाला मोहून टाकणाºया सप्तरंगांची उधळण करीत ग्रामीण भागातील डोंगरदºयात नानाविध रानफुलांनी निसर्गसृष्टीला जणूकाही पिंताबर परिधान केल्याचे चित्र श्रावणमासात दिसून येते. या निसर्गरम्य सप्तरंगी वातावरणात हिरव्यागार माळरानावर साज चढवतात ती विविधरंगी रानफुले. पावसाळ्यात ग्रामीण भागात डोंगर उतारावर दुर्मीळ अशी रानफुलं उमलत असतात.
-------------
सप्तरंगांची उधळण
खडकावर, डोंगरकपारीत, माळरानात, झाडांवर मोठ्या प्रमाणावर सप्तरंगांची उधळण करणारे फुले दृष्टीस पडतात. याच फुलांकडे आकर्षित होत असंख्य फुलपाखरे, मधमाशा या निसर्गरम्य पर्वणीचा आस्वाद घेत असतात.
-------------
..अशी आहेत रानफुले
कवळीची फुले, शेवळाची फुले, कळलावी, रानभेंडी, कुरडू, अंबाडी, गंतुरी, चाफा, हरणडोडी, टंटणी, दिंडा, कवदर, शोनक, निरगुडी, साग, खुरासणी, घाणेरी, तोंडली, कारवी, करदळी, सीतेची वेणी, रुई, धोतरा, टेहरा, भोंडरा, ताह्मण, रानझेंडू, नेवाळा, कचोरा, तरोटा, हादगा.