‘नेचर्स बोट क्लब’ला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 12:15 AM2017-11-05T00:15:19+5:302017-11-05T00:15:25+5:30

 'Natchars Boat Club' Musical Instruments | ‘नेचर्स बोट क्लब’ला मुहूर्त

‘नेचर्स बोट क्लब’ला मुहूर्त

Next

नाशिक : कोट्यवधी रु पये खर्च करून गंगापूर धरणालगत साकारलेल्या नाशिककरांच्या ‘नेचर्स बोट क्लब’ला अखेर मुहूर्त लाभणार आहे. जलसंपदा खात्याकडून पर्यटन विकास महामंडळाकडे हा प्रकल्प हस्तांतरित करण्यात आल्यानंतर महामंडळाने याबाबत हालचाली करत या आठवड्यामध्ये प्रधान कार्यालयाद्वारे ‘बोट क्लब’ची खुली निविदा प्रसिद्ध होण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्याचे समजते.
नाशिकच्या पर्यटनक्षेत्राला चालना मिळावी, या दृष्टीने २०१४ साली तत्कालीन पर्यटन व राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन बोट क्लबची मुहूर्तमेढ रोवली. बोट क्लबच अस्तित्वात येऊन चार वर्षांचा कालावधी लोटला; मात्र या प्रकल्पाचे लोकार्पण होऊ शकले नाही. जलसंपदा विभागाने आठ कोटी ४७ लाख रुपये खर्च करून विविध प्रकारच्या अत्याधुनिक अशा ४७ बोटी खरेदी केल्या. या सर्व बोटी मागील अनेक महिन्यांपासून प्रकल्पाच्या वास्तूमध्ये पाणकापडाने झाकून ठेवण्यात आल्या आहेत. प्रकल्पाला लागलेले ग्रहण सुटण्याची चिन्हे असून, बोट क्लब नाशिककरांच्या सेवेत लवकरात लवकर यावे, यासाठी प्रादेशिक कार्यालयाकडून सातत्याने प्रधान कार्यालयाकडे प्रयत्न सुरू आहे, असे प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे यांनी सांगितले. गंगापूर धरण परिसर पर्यटकांचा नेहमीच पसंतीचा राहिला आहे. यामुळे या भागात पर्यटकांची वर्दळ पहावयास मिळते. जवळच वायनरी, द्राक्ष मळे, निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे पर्यटक या भागात आवर्जून हजेरी लावतात. त्यामुळे नाशिकच्या पर्यटनाच्या दृष्टीने येथे धरण पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘नेचर्स बोट क्लब’ मैलाचा दगड ठरणार आहे. पॅरासेलिंग, जेट स्कीस्, बनाना, पॅडल बोटींचा या क्लबमध्ये समावेश असून २५ साध्या बोटी, तर २२ इंजिन असलेल्या मोटर बोटी आहेत. जेट स्कीस् एकूण दहा आहेत, तर पॅरासेलिंग दोन असल्याची माहिती स्थापत्त अभियंता महेश बागुल यांनी दिली. या बोटी अत्याधुनिक असून, पर्यावरण व पर्यटकांच्या दृष्टीने सुरक्षित आहेत. बोटींद्वारे जलप्रदूषणाला निमंत्रण मिळणार नसल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
जलसंपदा विभागाची ‘लक्ष्मणरेषा’ 
बोट क्लब पर्यटन विकास महामंडळामार्फत निविदा प्रसिद्ध करून सुरू करण्यात आले तरी त्या क्लबमधील सर्व बोटी ज्या गंगापूर धरणात धावणार आहेत. त्यांच्यापुढे जलसंपदा खात्याची ‘लक्ष्मणरेषा’ राहणार आहे. जलसंपदा विभागाने आखून दिलेल्या सीमारेषेच्या आतमध्येच बोटी चालविण्याची परवानगी संबंधित निविदा भरणाºया ठेकेदाराला मिळणार आहे.

 

Web Title:  'Natchars Boat Club' Musical Instruments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.