तत्त्वनिष्ठ व्यक्तींमुळे देशनिर्माण : भय्याजी जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 01:22 AM2021-10-15T01:22:51+5:302021-10-15T01:23:47+5:30

कलम ३७० रद्द झाले, राममंदिर उभे राहील, कदाचित समान नागरी कायदादेखील होईल. मात्र, त्यातून देशनिर्माणाचे कार्य होणार नाही. तर देश हा राजाभाऊंसारख्या तत्त्वनिष्ठ व्यक्तींमुळे निर्माण होतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी यांनी केले. यावेळी नाशकात संघ रुजविणारे स्व. राजाभाऊ गायधनी यांनी लिहिलेल्या ‘संघ सुगंध’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.

Nation building due to principled people: Bhayyaji Joshi | तत्त्वनिष्ठ व्यक्तींमुळे देशनिर्माण : भय्याजी जोशी

संघ सुगंध पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी भय्याजी जोशी. समवेत सुधाताई दाठोडे, नानासाहेब जाधव, रमेश पतंगे.

Next
ठळक मुद्दे स्व. राजाभाऊ गायधनी लिखित ‘संघ सुगंध’ पुस्तकाचे प्रकाशन

नाशिक : कलम ३७० रद्द झाले, राममंदिर उभे राहील, कदाचित समान नागरी कायदादेखील होईल. मात्र, त्यातून देशनिर्माणाचे कार्य होणार नाही. तर देश हा राजाभाऊंसारख्या तत्त्वनिष्ठ व्यक्तींमुळे निर्माण होतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी यांनी केले. यावेळी नाशकात संघ रुजविणारे स्व. राजाभाऊ गायधनी यांनी लिहिलेल्या ‘संघ सुगंध’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.

कुर्तकोटी सभागृहात झालेल्या या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, ज्येष्ठ लेखक रमेश पतंगे, गायधनी यांच्या कन्या सुधाताई दाठोडे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना जोशी यांनी संघाने पूर्णपणे समर्पित जीवन जगणारे आणि जीवनाच्या अंतापर्यंत ते कार्य ध्येयाने करणारे हजारो स्वयंसेवक निर्माण केल्याचे सांगितले. त्यातही १९४८ च्या पहिल्या बंदीनंतरच्या अंधकारमय कालखंडात राजाभाऊंसारखे जे स्वयंसेवक ठामपणे उभे राहिले, अशा समाजासाठी जगलेल्यांमुळेच संघाचा आता वटवृक्ष झाल्याचेही जोशी यांनी नमूद केले. यावेळी बोलताना पतंगे यांनी राजाभाऊ जे जीवन जगले त्यातील घटना, व्यक्ती, प्रसंग त्यांनी त्यातून मांडले असल्याचे सांगितले. एका महान कर्मयोग्याच्या जीवनाचे दर्शन त्यातून होत असल्याचे सांगितले. दाठोडे यांनी त्यांच्या वडिलांच्या काही आठवणी सांगितल्या. तसेच प्रसिद्धीपराङ्मुखता हा त्यांचा स्थायीभाव असल्यानेच त्यांनी लिहिलेले हे पुस्तक त्यांच्या निधनानंतरच प्रकाशित होत असल्याचे सांगितले. जाधव यांनी राजाभाऊ हे संघाचे मार्गदर्शक आणि संपर्कात येणाऱ्याला प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते, असे सांगितले. यावेळी राजाभाऊ यांनी रचलेल्या ‘हा शोक कशाला, कशास अश्रुमाला’ या गीतावर मोहन उपासनी यांनी लावलेल्या चालीसह श्रीराम तत्त्ववादी यांनी गायन केले. स्वानंद बेदरकर यांनी सूत्रसंचालन केले.

देवदुर्लभ कार्यकर्ते

गोळवलकर गुरुजींनंतर बाळासाहेब देवरस जेव्हा सरसंघचालक झाले, तेव्हा ते म्हणाले माझे काम सोपे आहे. गुरुजींनी रचलेला पाया आणि संघाला लाभलेले देवदुर्लभ कार्यकर्ते मिळाल्याचे त्यांनी सांगितले. देवदुर्लभ कार्यकर्ता म्हणजे काय, त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजाभाऊ होते, असेही जोशी यांनी सांगितले.

 

संघ हा अनुभवण्याचा प्रकार

संघाला बुद्धीने किंवा चिंतनाने समजून घेता येत नाही. संघ हा अनुभवावा लागताे. मध्यंतरी एक खूप मोठी व्यक्ती सरसंघचालकांना भेटून तुमच्या कार्यात आम्हाला सहभागी करून घ्या म्हणाली; तसेच संघाचे व्यक्तिनिर्माणाचे कार्य आम्हाला समजून घ्यायचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी तुम्हाला संघाच्या शाखेत यावे लागेल, असे सरसंघचालकांनी त्यांना सांगितल्याचेही जोशी यांनी नमूद केले.

 

Web Title: Nation building due to principled people: Bhayyaji Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.