राष्ट्रीय मेंदू सप्ताहास प्रारंभ
By Admin | Published: December 20, 2015 11:03 PM2015-12-20T23:03:55+5:302015-12-20T23:05:18+5:30
न्यूरॉलॉजी इंडियन अकॅडमीचा उपक्रम : जनजागृतीवर भर
नाशिक : मेंदूशी संबंधित आजारांबाबत जनजागृती व्हावी, यासाठी न्यूरॉलॉजी इंडियन अकॅडमीतर्फे ‘राष्ट्रीय मेंदू आठवडा’ साजरा केला जातो़ या सप्ताहास शनिवारी (दि़१८) सुरुवात झाली असून, तो २४ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे़ या कालावधीत मेंदूच्या आजारांकडे दुर्लक्ष न करता उपचारांबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी प्रबोधन केले जाणार असल्याची माहिती संघटनेचे डॉ़ मनोज गुल्हाने यांनी आयएमए सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली़
डॉ़ गुल्हाणे यांनी सांगितले की, शहरातील मेंदूतज्ज्ञांचे क्लिनिक, हॉस्पिटल तसेच सार्वजनिक ठिकाणी मेंदू व मेंदूसंलग्न आजारांबाबत या सप्ताहात मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जाणार आहे़ १९९१ मध्ये न्यूरोलॉजी अकॅडमीची स्थापना झाल्यानंतर दरवर्षी १८ ते २४ डिसेंबर हा सप्ताह मेंदू सप्ताह म्हणून साजरा केला जातो़ ब्रेन ट्यूमर व मेंदूज्वर हे दोनच आजार नागरिकांना माहिती आहेत़
मात्र, मेंदूशी संबंधित अनेक आजार असून, त्याबाबत माहिती नसल्याने हे आजार बळावतात व जीव गमवावा लागतो़ मेंदूच्या आजारासाठी लठ्ठपणा, धूम्रपान, उच्चरक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, हृदयरोग, मद्यसेवन, एका जागेवर बसून काम करण्याची सवय आदि कारणीभूत ठरतात़ नाशिक जिल्ह्यातील किमान दहा टक्के नागरिकांना कोणत्या न कोणत्या स्वरूपाचा मेंदूशी संबंधित आजार आहे, यामध्ये मायग्रेनचे (डोकेदुखी) प्रमाण अधिक असून, याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते़
मेंदूचे सुमारे ९० टक्के आजार हे पूर्णपणे बरे होणारे आहेत़ नागरिकांनी वारंवार होणारी तीव्र डोकेदुखी, फिट याकडे दुर्लक्ष न करता यावर त्वरित मेंदूतज्ज्ञांकडून उपचार करून घेणे गरजेचे असल्याचे उपस्थित मेंदूविकार तज्ज्ञांनी सांगितले़ यावेळी डॉ. धनंजय डुबेरकर, डॉ. श्रीपाल शाह, डॉ. सुहास पाटील, डॉ. राहुल बाविस्कर, डॉ. भूषण उभाळे, डॉ. आनंद दिवाण, डॉ. श्रीकांत पाळेकर, डॉ़ अमित येवले यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)