येवल्यातील विद्यार्थिनीला राष्ट्रीय जीवनरक्षा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 01:35 AM2021-07-31T01:35:33+5:302021-07-31T01:35:59+5:30
महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय जीवनरक्षा पुरस्कार येवल्यातील दिव्या सोमनाथ खळे या १३ वर्षीय विद्यार्थिनीला प्रदान करण्यात आला. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
नाशिक : महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय जीवनरक्षा पुरस्कार येवल्यातील दिव्या सोमनाथ खळे या १३ वर्षीय विद्यार्थिनीला प्रदान करण्यात आला. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. नावीन्यपूर्ण कार्य, सामाजिक सेवा, शैक्षणिक, क्रीडा, कला व संस्कृती, शूरता अशा उल्लेखनीय कामगिरीसाठी केंद्राच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. दरवर्षी दिल्लीत या पुरस्काराचे वितरण केेले जाते. परंतु कोराेनामुळे हा सोहळा होऊ शकला नाही. केंद्राकडून नाशिकजिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुरस्कार पाठवून देण्यात आला होता. पालकमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी या पुरस्काराने सन्मानपूर्वक वितरण करण्यात आले.
सन २०१८मध्ये गणेशोत्सवात सातवर्षीय मुलगा विद्युत वायरींना चिकटला असता दिव्या हिने जिवाची पर्वा न करता त्याच्या शर्टला पकडून त्याला विद्युत वायरींपासून बाजूला केले. यामध्ये तिलादेखील इजा झाली होती. तिच्या या अतुलनीय धाडसाबद्दल तिला केंद्राच्या महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाच्या वतीने जीवनरक्षा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. २०१९ सालच्या या पुरस्काराचे शुक्रवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात वितरण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस आयुक्त दीपक पाण्डये, पोलीस अधीक्षक सचिन पाटील आदी उपस्थित होते.
--कोट--
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि छत्रपती शिवराय या थोर महापुरुषांच्या सामाजिक कार्यामुळे मला प्रेरणा मिळते. मदतीसाठी धावून जाणे ही समाजसेवाच आहे. यापूर्वीदेखील पाण्याच्या हौदात बुडणाऱ्या एका मुलाला मी वाचविले आहे. भविष्यात मला प्रशासकीय किंवा पोलीस अधिकारी होण्याची इच्छा आहे.
- दिव्या खळे, पुरस्कारप्राप्त विद्यार्थिनी