नॅशनल स्पेस सोसायटीचे ‘लोकल चॅप्टर’ नाशिकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:49 AM2018-04-05T00:49:42+5:302018-04-05T00:49:42+5:30
अंतराळ संशोधनासाठी जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या नामांकित नॅशनल स्पेस सोसायटीचे पूर्णपणे स्वतंत्ररीत्या कार्यान्वित असे ‘लोकल चॅप्टर’ नाशिकला सुरू करण्यात आल्याची माहिती चॅप्टरचे सचिव स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांनी दिली.
नाशिक : अंतराळ संशोधनासाठी जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या नामांकित नॅशनल स्पेस सोसायटीचे पूर्णपणे स्वतंत्ररीत्या कार्यान्वित असे ‘लोकल चॅप्टर’ नाशिकला सुरू करण्यात आल्याची माहिती चॅप्टरचे सचिव स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांनी दिली.
नॅशनल स्पेस सोसायटीचे मुख्यालय वॉशिंग्टन येथे आहे. अंतराळ संशोधन व विकासासाठी जागतिक स्तरावरील ही कार्य करणारी संस्था आहे. नासा, इसा यांसारख्या विविध संस्था या संस्थेच्या सदस्य आहेत. अंतराळ क्षेत्रातील वैज्ञानिक या संस्थेचे सदस्य असतात. या जागतिक संस्थेमध्ये अंतराळ क्षेत्राशी संबंधित विविध देशांमधील तज्ज्ञांना सदस्य म्हणून माहिती दिली जाते. स्थानिक कें द्र (लोकल चॅप्टर) सर्वच देशात आहे. भारतातील चंदीगढ व कोलकाता येथे या संस्थेचे केंद्र आहे. महाराष्टÑात प्रथमच नाशिक येथे पूर्णपणे कार्यान्वित असलेले केंद्र म्हणून अलीकडेच मान्यता देण्यात आली आहे. ‘नॅशनल स्पेस सोसायटी, नाशिक इंडिया चॅप्टर’ असे नाव स्थानिक केंद्राला देण्यात आले आहे. इस्त्रोचे माजी वैज्ञानिक अभियंता अविनाश शिरोडे यांची नाशिकच्या या केंद्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सचिवपदी नासाच्या स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांची नियुक्ती तसेच अभियंता विजय बाविस्कर यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जाखडी या जागतिक संस्थेचे मागील सात वर्षांपासून सदस्य आहे. यापूर्वी अमेरिकेत झालेल्या आंतरराष्टÑीय अंतराळ संशोधन विकास परिषदेतही जाखडी यांनी प्रतिनिधित्व केले आहे. नाशिक शहरात या जागतिक संस्थेचे केंद्र स्थापन झाल्यामुळे अंतराळ ज्ञान-विज्ञान व जन-जागृतीसाठी सर्वसामान्य नागरिकांकरिता विविध कार्यक्रम तसेच जगभरातून होणाऱ्या विविध मोहिमांच्या घडामोडींविषयीची सखोल माहिती दिली जाणार असल्याचे जाखडी यांनी सांगितले. यासाठी विविध नामांकित अंतराळ क्षेत्रातील तज्ज्ञांचे व्याख्यान, कार्यशाळा, परिसंवाद, स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. नाशिक-ला एचएएल, विमानतळ, डीआरडीओ यांसारख्या संस्था आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची अधिक संख्या शहरात असून त्यांना या नव्या क्षेत्राविषयी कुतूहलदेखील आहे. म्हणून नाशिकला या संस्थेने केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली. या केंद्राला अधिकाधिक वाव नाशिकमध्ये असून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याचा विश्वास शिरोडे यांनी व्यक्त केला आहे. अधिकाधिक लोकांनी व विद्यार्थ्यांनी या केंद्राशी स्वत:ला जुळवून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.