निवडणुकीमुळे राष्टÑीय प्रज्ञाशोध परीक्षा लांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 01:34 AM2019-03-30T01:34:24+5:302019-03-30T01:34:40+5:30
राज्यस्तरावरील राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा नोव्हेंबर महिन्यात पार पडली. त्यानंतर इयत्ता दहावी राज्यस्तर परीक्षेत निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांची राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा लोकसभा निवडणुकीमुळे दि. १२ मे ऐवजी दि. १६ जून २०१९ रोजी होणार आहे.
येवला : राज्यस्तरावरील राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा नोव्हेंबर महिन्यात पार पडली. त्यानंतर इयत्ता दहावी राज्यस्तर परीक्षेत निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांची राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा लोकसभा निवडणुकीमुळे दि. १२ मे ऐवजी दि. १६ जून २०१९ रोजी होणार आहे.
इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा देता येते. सदर परीक्षा राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर वर्षातून एकदाच घेण्यात येते. राज्यस्तरीय परीक्षा नोव्हेंबर २०१८ मध्ये पार पडली. त्यात ग्रामीण भागातील विद्यार्थी चांगल्या प्रकारे चमकले आहेत. संबंधित निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र एप्रिल २०१९ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात एनसीईआरटीच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
केंद्र सरकारने यंदापासून राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत एक हजारऐवजी दोन हजार प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एनसीईआरटीने राज्यातील विद्यार्थ्यांच्या कोट्यात दुपटीने वाढ केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा कोटा दुप्पट झाला असून, राज्यातील ७७४ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा देता येणार आहे. या परीक्षेसाठी ८६ हजार २८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ८१ हजार ६९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. राज्य भरातील २७२ केंद्रांवर झालेल्या या परीक्षेत एकूण ४५ हजार १५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एनसीईआरटीने राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेसाठी महाराष्ट्राकरिता ३८७ विद्यार्थ्यांचा कोटा निश्चित केला होता. त्यानुसार ३८७ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेसाठी निवड करण्यात आली होती.
ग्रामीण भागालाही वाव
यापूर्वी सीबीएसई अभ्यासक्र मातील विद्यार्थी या परीक्षेच्या गुणवत्ता यादीत झळकत होते; मात्र यंदा ग्रामीण भागातील स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांनीदेखील गुणवत्तेची चुणूक दाखविली आहे. त्यातच राज्याचा कोटा वाढल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील वाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.