कथित सर्पमित्रांची स्टंटबाजी रोखण्याची राष्टवादीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 03:25 PM2018-10-08T15:25:56+5:302018-10-08T15:27:24+5:30
अंधश्रध्देपोटी पैशांचा पाऊस पाडण्यासारख्या अघोरी कृत्यांसाठीही यापुर्वी अनेक दुर्मिळ सापांचा बळी दिला गेल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
नाशिक : वाढत्या शहराबरोबर स्वयंघोषित कथित सर्पमित्रांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अशा सर्पमित्रांकडून शहरात होणारी सर्पांची स्टंटबाजी रोखण्याची मागणी राष्टवादी कॉँग्रेसकडून पश्चिम वनविभागाच्या कार्यालय अधिक्षकांकडे करण्यात आली आहे.
शहरात पंजाबच्या सर्पमित्राचा स्टंटबाजी करताना सर्पदंश होऊन झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर पुन्हा कथित सर्पमित्रांची स्टंटबाजी चर्चेत आली आहे. शहरासह उपनगरांमध्ये कथित सर्पमित्रांची संख्या वाढली असून या सर्पमित्रांकडून नागरी वसाहतीतून सर्प धरले जातात अन् सोडलेही जातात, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. सर्पांना धोकादायकरित्या हाताळून विविध स्टंट दाखविण्याचा प्रयत्नही होतो. अंधश्रध्देपोटी पैशांचा पाऊस पाडण्यासारख्या अघोरी कृत्यांसाठीही यापुर्वी अनेक दुर्मिळ सापांचा बळी दिला गेल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. वनविभागाने योग्य प्रशिक्षण घेतलेल्या सर्पमित्रांची अधिकृत नोंदणी करून त्यांच्या नावांची घोषणा जनतेसमोर क रावी. तसेच त्यांना नोंदणी क्रमांक असलेले ओळखपत्रही दिले जावे, जेणेकरून कथित सर्पमित्रांचे फावणार नाही, असे निवेदनात नमुद करऱ्यात आले आहे. निवेदनावर अंबादास खैरे यांच्यासह आदि पदाधिका-यांच्या स्वाक्ष-या आहेत.