मुक्त विद्यापीठात राष्ट्रवादीचे आंदोलन
By admin | Published: September 28, 2016 12:25 AM2016-09-28T00:25:30+5:302016-09-28T00:26:48+5:30
प्रवेशद्वार बंद : शुल्कवाढीविरोधात विद्यार्थी आक्रमक
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने विविध अभ्यासक्र मांचे शुल्क कमी करावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने मंगळवारी मुक्त विद्यापीठाचे मुख्य गेट बंद करून आंदोलन केले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेतात. त्यामुळे इतर विद्यापीठांपेक्षा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात शुल्क कमी असणे अपेक्षित आहे. परंतु विद्यापीठाकडून प्रमाणापेक्षा अधिक शुल्क आकारले जात असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यापीठाचे गेट बंद केले.
अन्य विद्यापीठांमध्ये म्हणजेच मुंबई विद्यापीठ २५० आणि पुणे विद्यापीठ ५ हजार व इतर मुक्त विद्यापीठांमध्ये याच अभ्यासक्रमांसाठी ६ ते ८ हजार रुपये फी आकारली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. विद्यार्थी कर्ज व उसनवारी करून ही रक्कम टप्प्याटप्प्याने भरतात. मात्र यावर्षी अचानक विद्यापीठाने फतवा काढून एकरकमी ४० हजार रुपये शुल्क सक्तीचे केले आहे. त्याचप्रमाणे हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम अभ्यासक्रमांसारख्या कौशल्याधारित, व्यवसाय उपयोगी अभ्यासक्रमांचे शुल्कही वाढविण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, काही विद्यार्थ्यांना तर शिक्षण सोडण्याची वेळ आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. तसेच विद्यापीठाने केलेली फी वाढ मागे घ्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दीपक वाघ, शहराध्यक्ष गौरव गोवर्धने, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, सुशांत भालेराव, राजेश बोडके,
डॉ. रवि नाटकर, अविनाश अरगडे आदिंसह विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. (प्रतिनिधी)