महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयावर राष्टवादीची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:14 AM2018-08-28T00:14:08+5:302018-08-28T00:15:26+5:30
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वडपे ते धुळे रस्त्यावरील खड्डे आठ दिवसांत भरण्यात येतील. खड्डे न भरल्यास आठ दिवसांनंतर टोल बंद करू आणि अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देऊ, असे तोंडी आश्वासन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प अधिकारी प्रशांत खोडसकर यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांना दिले.
नाशिक : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वडपे ते धुळे रस्त्यावरील खड्डे आठ दिवसांत भरण्यात येतील. खड्डे न भरल्यास आठ दिवसांनंतर टोल बंद करू आणि अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देऊ, असे तोंडी आश्वासन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प अधिकारी प्रशांत खोडसकर यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांना दिले. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वरील वडपे ते धुळे या चौपदरी रस्त्याची दुरवस्था झाली असून, गेल्या आठवड्यात घोटीजवळ खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महामार्गावरील खड्डे बुजविण्यात यावे तोपर्यंत टोल बंद करण्यात यावा यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या कार्यालयात जवळपास दीड तास ठिय्या मांडला. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वरील वडपे (जि. ठाणे) ते धुळे हा मार्ग बीओटीद्वारे चौपदरी करण्यात आलेला असूनही त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडून या रस्त्याची चाळण झालेली आहे. कल्याण फाटा ते वडपे या लांबीतील रस्त्याचीदेखील अशीच दुर्दशा झालेली असून, त्यामुळे या महामार्गावर अपघात होत आहेत. त्यामुळे जोपर्यंत टोल कंपन्यांकडून हा रस्ता सुस्थितीत केला जात नाही तोपर्यंत या रस्त्यावरील टोल तत्काळ बंद करावा. येत्या आठ दिवसांत या रस्त्याची सुधारणा न झाल्यास राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्या वतीने टोल बंद पाडला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले, माजी आमदार जयवंतराव जाधव, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, बाळासाहेब कर्डक, मुख्तार शेख, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, धनंजय निकाळे, हिरामण खोसकर, सुषमा पगारे, समीना मेमन, किशोरी खैरनार, संजय खैरनार, बाळासाहेब गिते, सुरेखा निमसे, दादा कापडणीस, पूनम शहा, ज्ञानेश्वर पवार आदी उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांसमवेत चर्चा
यावेळी प्राधिकरणचे अधिकारी प्रशांत खोडसकर यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून आठ दिवसांत रस्त्यावरील खड्डे भरले जातील अन्यथा टोल बंद केला जाईल, असे लेखी व तोंडी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.