बालेकिल्ला राखण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज
By admin | Published: February 16, 2017 11:08 PM2017-02-16T23:08:13+5:302017-02-16T23:08:27+5:30
सत्तासंघर्ष : राजकीय समीकरणांकडे तालुक्याचे लक्ष
महेश गुजराथी चांदवड
बालेकिल्ला असलेला दुगाव गट राखण्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेससमोर आव्हान उभे ठाकले असून, हा गट भाजपा किंवा शिवसेनेकडे जातो हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या गटात दोन तालुकाध्यक्ष व शिवसेनेचे नेते, रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष अशी चौरंगी लढत होत असून, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
दुगाव गटात काही गावे नव्याने समाविष्ट झाली आहेत. त्यात दुगाव जिल्हा परिषद गट सर्वसाधारण झाल्याने इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. यापूर्वी हा गट अनुसूचित जमातीसाठी राखीव होता. तो सर्वसाधारण झाल्याने या गटात चुरशीची लढत होत आहे. या गटात पूर्वी २२ गावे होती. आता ही संख्या २८ झाली आहे. दुगावात यापूर्वीचे वागदर्डी, रापली, वडगावपंगू, कातरवाडी ही गावे आता तळेगावरोही गटात गेली आहे, तर वडबारे नांदूरटेक, इंद्रायवाडी, राजदेरवाडी, हरणूल, हरसूल, अहिरखेडे, पिंपळगाव धाबळी, गंगावे, पाथरशेंबे ही दहा गावे आता नव्याने समाविष्ट झाली आहेत. विशेषत: दुगाव पंचायत समिती गणात सोळापैकी दहा गावे हे नवीन असल्याने राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत. २००७ साली या दुगाव गटाने माजी आमदार शिरीष कोतवाल यांचे राजकीय पुनर्वसन केले व गटातून जनतेने निवडून दिले. त्यावेळी डॉ. सयाजीराव गायकवाड (राष्ट्रवादी काँग्रेस) व शिरीष कोतवाल (काँग्रेस) अशी लढत झाली होती; मात्र कोतवाल निवडून आले व ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले होते. याच गटातून आता राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील शेलार, शिवसेनेचे प्रा. राजेंद्र सोमवंशी, रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र गांगुर्डे अशी चौरंगी लढत होत आहे. या सर्व उमेदवारांनी गटातील जनतेच्या दोन वेळा भेटी घेतल्या. प्रचार दौरे होत आहेत; मात्र या गटातील पाणीप्रश्न व रस्त्यांची समस्या सर्वात जुनी आहे. याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे गटातील मतदारांचे म्हणणे आहे. यावेळी तीन तालुकाध्यक्ष व शिवसेना अशी लढत होणार असल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेस गट ताब्यात ठेवतो की भाजपा शिवसेनेकडे देतो हे येत्या २३ फेब्रुवारीला समजणार आहे.